Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Plans for Air India Merger : एअर इंडियाच्या पंखाना बळ देण्यासाठी टाटा समूहाने घेतला मोठा निर्णय

Tata Group , Air India Merger, Tata Group Plans for Merger , Vistara Airlines, Air Asia India

Image Source : www.twitter.com

Tata Plans for Air India Merger : केंद्र सरकारकडून एअर इंडियाला खरेदी केल्यानंतर टाटा समूहाने या कंपनीच्या कार्यपद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाटा ग्रुप एअर इंडियाच्या बाबतीत मोठा निर्णय घेणार आहे.

देशातील बड्या उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपने एअर इंडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाने ज्या विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे अशा कंपन्यांना एअर इंडियामध्ये विलीन केले जाणार आहे. एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडिया अशा चारही विमान कंपन्या एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा जम्बो प्लॅन टाटा ग्रुपने नुकताच जाहीर केला.

एअर इंडियातील विलीनीकरणानंतर विस्तारा एअरलाईन्सची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विस्तारा ब्रॅंड हा टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्यातील संयुक्त उद्यम आहे. पुढील वर्षभरात विमान कंपन्यांचे अधिग्रहण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा ग्रुप हा एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावणारा उद्योग समूह ठरला होता. केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेनुसार टाटा ग्पुरने एअर इंडियाला  जवळपास 18000 कोटींना खरेदी केले होते. यात टाटा ग्रुपने 2700 कोटींची रोख रक्कम आणि 15300 कोटींची कर्जे परस्पर फेडली होती. जानेवारी 2022 मध्ये टाटांना एअर इंडियाचे मालकी हक्क प्राप्त झाले. त्याशिवाय टाटा ग्रुपची एअर एशिया इंडियामध्ये 83.67% आणि विस्तारा एअरलाईन्समध्ये 51% हिस्सेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांना एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा टाटा समूहाचा प्लॅन आहे.

एअर इंडियाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न

एअर इंडियाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी टाटा ग्रुपकडून टप्प्याटप्याने प्रयत्न केले जात आहे. लवकरच एअर इंडियासाठी 8000 कोटींचे भांडवल उभारले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात एअर इंडियाच्या सेवेत प्रचंड सुधारणा दिसून आली. कंपनीचा On time Performance 87.1% इतका होता. जो सध्याची क्रमांक एकची कंपनी इंडिगोपेक्षा सरस ठरला. या श्रेणीत टाटाच्या विस्तारा आणि एअर एशिया इंडिया या दोन कंपन्या सर्वोत्तम वेळेसाठी अव्वल ठरल्या आहेत. एअर इंडियाकडे परदेशातील डेस्टिनेशनचे खास मार्गांचे प्राईम स्लॉट आहेत. त्यामुळे त्याचा फायदा करुन घेण्यासाठी टाटा ग्रुपने कॅम्बेल विल्सन यांच्या नेतृत्वात एअर इंडियात मोठे बदल सुरु केले आहेत. कंपनीने जुन्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला नवीन पायलट्स आणि केबिन क्रूची भरती केली जाणार आहे.

पुन्हा 68 वर्षांनी एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपला मिळाली

एअर इंडियाने 30 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. सध्या कंपनीकडे एकूण 128 विमानांचा ताफा आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडे 25 विमाने आहेत. टाटा सन्सचे संस्थापक जे.आर.डी टाटा यांनी 1932 मध्ये एअर इंडियाची मुहूर्तमेढ रोवली होती. 1953 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बड्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि एअर इंडिया भारत सरकारची विमान कंपनी बनली. 1977 मध्ये सरकारने एअर इंडियात मालकी हिस्सा खरेदी केला होता. पुन्हा 68 वर्षांनी एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपला मिळाली आहे.