फोर्ड इंडियाचा गुजरात राज्यातील साणंद येथील उत्पादन प्रकल्पाचे संपादन टाटाची सहाय्यक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (Tata Passenger Electric Mobility Limited - TPEML) या कंपनीमार्फत 10 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होईल, अशी माहिती टाटा मोटर्सने दिली.
टाटा मोटर्सने ऑगस्ट, 2022 मध्ये साणंद येथील फोर्ट इंडियाच्या प्रकल्पाबाबत करार केला होता. टाटा ग्रुपमधील टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने 7 ऑगस्ट, 2022 रोजी, फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा (Ford India Private Limited-FIPL) गुजरातमधील साणंद प्रकल्प 725.7 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती.
10 जानेवारीपर्यंत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होणार
प्रकल्प संपादन प्रक्रियेत फोर्ट इंडिया प्रकल्पातील संपूर्ण जमीन आणि इमारतीचा समावेश आहे. तसेच या प्रकल्पातील यंत्रसामग्री आणि उपकरणे, वाहन निर्मितीचा संपूर्ण प्रकल्प आणि या प्रकल्पात काम करणारे पात्र कर्मचारी यांचेही हस्तांतरण होणार आहे. टाटा मोटर्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित प्रकल्प हस्तांतरणासाठी प्रशासनाच्या मंजुरी पावतीसह, सरकारच्या आवश्यक अटींची पूर्तता करून दोन्ही कंपन्यांनी 10 जानेवारी 2023 रोजी हा व्यवहार पूर्ण करण्याच्या दिशेने निर्णय घेतला आहे.
फोर्ड इंडियामधील पात्र कर्मचारी टाटासोबत काम करणार!
फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL)च्या वाहन निर्मिती प्रकल्पातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना Tata Passenger Electric Mobility Limited सोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे. जे कर्मचारी फोर्ड इंडियासोबत काम करत होते आणि ज्यांनी टाटाची ऑफर स्वीकारली आहे. असे कर्मचारी 10 जानेवारी 2023 पासून Tata Passenger Electric Mobility Limited या कंपनीचे कर्मचारी होतील असे सांगितले गेले.
टाटा मोटर्सने त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) उद्योगाने गेल्या काही वर्षांत मार्केट बीटिंग ग्रोथ दिली आहे. तसेच कंपनीने नवीन प्रोडक्टसवर लक्ष केंद्रीत करून इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये मोठी गुंतवणूक करून ही गती कायम ठेवण्याचे नियोजन केले आहे. टाटाने फोर्ड इंडिया प्रकल्प आपल्या ताब्यात घेतल्यामुळे टाटाची उत्पादन क्षमता आता चांगलीच वाढणार आहे. त्याचा फायदा नक्कीच कंपनीला होईल. या नवीन कंपनीच्या टेकओव्हरमुळे टाटा प्रत्येक वर्षी 4.20 लाख युनीटपर्यंत उत्पादन वाढवू शकेल, असे कंपनीला विश्वास आहे.