गुजरातमधील साणंद येथील अमेरिकन कंपनीचा फोर्डचा प्लांट ताब्यात घेण्यास टाटा मोटर्सला मान्यता मिळाली आहे. या दोन्ही कंपन्यांनी याबाबत गुजरात सरकारसमोर प्रस्तार सादर केला होता. या प्रस्तावाला गुजरात मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून लवकरच दोन्ही कंपन्यांमधील सामंजस्य करार पूर्ण झाला आहे. दरम्यान, फोर्ड कंपनीने गेल्या वर्षी, भारतातील प्लांट बंद करणार असल्याचे संकेत दिले होते.
कंपनीने साणंदमधील प्लांटमधून यावर्षी एप्रिलपर्यंत प्रवासी वाहने बनवण्याचे बंद केले होते. तसेच या महिन्यात फोर्ड कंपनीने भारतातून इलेक्ट्रिकल व्हेईकलचे (Electrical Vehicle) उत्पादन बंद करून भारतातील व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. गुजरात मंत्रिमंडळाने या दोन्ही कंपन्यांच्या प्रस्तावावर ना-हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. टाटा मोटर्स आणि फोर्ड कंपनी यांच्यातील सामंजस्य करार झाला आहे. गुजरात सरकारने या करारास पूर्णत: मान्यता दिली आहे. तरीही दोन्ही कंपन्यांमधील व्यावसायिक वाटाघाटी अजून सुरू आहेत. या वाटाघाटी पूर्ण झाल्या की, दोन्ही कंपन्यांमधील करार पूर्णत्वास येईल. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक लिमिटेड (TPEML) आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL) यांनी सानंद वाहन निर्मिती सुविधेच्या संभाव्य संपादनासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर (MoU) सही केली असून अंतिम करार लवकरच होईल.
या करारामध्ये प्लांटसाठी वापरण्यात आलेली जमीन, इमारत, वाहन निर्मिती प्रकल्प, यंत्रसामग्री, उपकरणे आणि साणंद प्लांटमधील सर्व पात्र कर्मचारी यांच्या हस्तांतरणाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, टाटा मोटर्सने एका निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की, फोर्ड पॉवरट्रेन युनिटची जमीन आणि इमारत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक लिमिडेट (TPEML) कडून भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर पॉवरट्रेन उत्पादन सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.
फोर्ड कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहने बनवणार नाही
गुजरात सरकारने फोर्ड कंपनीला दिलेल्या सर्व सुविधा व सवलती, आहे त्या स्वरूपात टाटा मोटर्सला दिल्या जाणार आहेत. याला गुजरात सरकारनेही मान्यता दिली आहे. तसेच फोर्ड कंपनीने मे महिन्याच्या सुरूवातीलाच भारतात इलेक्ट्रिक वाहने बनवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यापूर्वी फोर्ड कंपनीचा जागतिक बाजारपेठेसाठी भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्लांट उभारण्याचा मानस व्यक्त केला होता.
फोर्ड भारतातील गुंतवणूक काढून घेणार!
फोर्ड इंडिया कंपनीची वेगवेगळ्या 20 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. याच आधारावर फेब्रुवारी, 2022 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनेंतर्गत (Production Linked Incentive Scheme) फोर्ड कंपनीची निवड करण्यात आली होती. पण कंपनी आता या योजनेतून आपला अर्ज मागे घेऊ शकते; कारण फोर्ड कंपनी यापुढे भारतात गुंतवणूक करणार नसल्याचे समजते.