Tata Tech IPO: टाटा समुहातील टाटा टेक कंपनीचा आयपीओ येणार, अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. पण याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. दरम्यान टाटा मोटर्सने टाटा टेक कंपनीतील आपला 9.9 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा टेक (Tata Tech) कंपनीमध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीची 9.9 टक्के भागीदारी आहे. टाटा मोटर्सने मात्र आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा हिस्सा क्लायमेट फोकस प्रायव्हेट इक्विटी फंड आणि रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशन खरेदी करणार आहे. टाटा मोटर्स आपला हा हिस्सा 1,613.7 कोटी रुपयांना विकणार असल्याचे बोलले जाते. क्लायमेट इक्विटी फंड 9 टक्के शेअर्स 1,467 कोटी तर रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशन 0.9 शेअर्स 146.7 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे.
टाटा टेकमधील हा हिस्सा विकण्याचा सौदा 27 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या डिलचा Tata Tech IPO वर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. टाटा समुह साधारण 19 वर्षानंतर आपल्या कंपनीचा आयपीओ आणत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी टाटा समुहातील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीचे 2004 मध्ये लिस्टिंग झाले होते. टाटा मोटर्सने टाटा टेकमधील हिस्सा विकल्याचा परिणाम टाटा टेकच्या आयपीओ होणार नसल्याचे बोलले जाते.
टाटा टेक कंपनी आयपीओच्या माध्यमातून 9.57 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. टाटा टेक कंपनीचा मागील दोन वर्षातील नफ्यात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातून कंपनीला 708 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हा नफा टाटा एलेक्सी (Tata Elxsi), एलअॅण्डटी टेक (L&T Tech) आणि केपीआयटी टेक (KPIT Tech) या कंपन्यांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते.