ऑनलाइन फूड डिलीवरी ऍप, स्विगीचा तुम्ही सर्वांनी कधी ना कधी वापर केलाच असेल. कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी मोठ्या प्रमाणात स्विगीचा वापर करतात. परंतु आता स्विगी वापरकर्त्यांना प्रत्येक ऑर्डरमागे 2 रुपयांचे अतिरिक्त 'प्लॅटफॉर्म शुल्क' भरावे लागणार आहे. म्हणजेच तुमचे बिल कितीही झाले तरी, त्यावर अतिरिक्त 2 रुपये तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत.
तुम्हांला कदाचित 2 रुपये ही रक्कम कमी वाटू शकते मात्र स्विगीकडे दररोज 1.5 दशलक्ष ऑर्डर येत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनीला 'प्लॅटफॉर्म शुल्क' मधून मोठा महसूल मिळणार आहे.
सध्या कंपनीने बंगळुरु आणि हैदराबाद शहरात हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मुंबई, दिल्ली, पुणे या शहरांमध्ये देखील प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाईल असे म्हटले जात आहे.
Swiggy started charging users a platform fee of ₹2 per order.
— Marketing Maverick (@MarketingMvrick) April 28, 2023
Initially rolled out for users in Bengaluru & Hyderabad. pic.twitter.com/jALjr2FeGc
कंपनीचा खर्च भागवण्यासाठी शुल्क
स्विगी वन (Swiggy One) आणि इंस्टामार्ट (Instamart) वापरणाऱ्या ग्राहकांकडून हे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. प्लॅटफॉर्म फी केवळ अन्न वितरणावर आकारले जाणार आहे.
व्यापार विषयक संशोधन करणाऱ्या टोफ्लर (Tofler) नुसार, आर्थिक वर्ष 2020-21 (FY21) मध्ये 2,145 कोटी रुपयांच्या स्विगीच्या महसुलात वार्षिक 23 टक्क्यांनी घट नोंदवली गेली होती. याच आर्थिक वर्षात कंपनीचा वार्षिक निव्वळ तोटा 65 टक्क्यांनी कमी होऊन 1314 कोटी इतका नोंदवला गेला होता.
परंतु मागच्या आर्थिक वर्षात 2021-22 (FY22) मध्ये स्विगीच्या महसुलात 124% वाढ नोंदवली गेली होती. परंतु निव्वळ तोटा 3628.90 करोड इतका प्रचंड वाढला आहे. गेल्या 2 आर्थिक वर्षांमध्ये कंपनीच्या निव्वळ तोट्यात होणारी ही वाढ कमी करण्याचे मोठे आव्हान स्विगीसमोर आहे. म्हणूनच कंपनीकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून स्विगी कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत होती. गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 380 कामगारांना कंपनीने कामावरून काढुन टाकले होते. कंपनीचा खर्च भागावा व अधिक महसूल उत्पन्न केला जावा यासाठी स्विगीने हा निर्णय घेतला आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
स्विगीचे सह-संस्थापक श्रीहर्ष मॅजेस्टी यांनी कर्मचाऱ्यांना एका मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीचा फूड डिलिव्हरीचा दर मंदावला असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमते साठी प्लॅटफॉर्म शुल्क म्हणून 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
What is @Swiggy?
— Ranga Sampath (@youplusai) April 29, 2023
An app based platform that customers use to order food, groceries etc.
Then, what is this Platform fee?
A fee that customers pay #Swiggy to be itself? pic.twitter.com/hEz2F0cRlx
ग्राहकांची नाराजी
आम्ही स्विगीवरून जेवण ऑर्डर करत असताना त्यांना डिलिव्हरी चार्जेस,हाताळणी शुल्क देतच असतो, मग हे प्लॅटफॉर्म शुल्क का आकारले जात आहे असा सवाल नेटीझन्सने स्विगीला विचारला आहे. हे अतिरिक्त शुल्क आम्ही स्विगीला का द्यावे असा सवाल देखील वापरकर्ते विचारत आहेत.