आपल्यापैकी अनेकांनी आजवर कधी न कधी एसटीने प्रवास केला असेल. लांबच्या प्रवासात नाष्ट्यासाठी किंवा जेवणासाठी बस कुठल्या तरी हॉटेलवर किंवा धाब्यावर थांबते. बऱ्याच वेळा सदर हॉटेल किंवा धाब्यावरचे जेवणाचे, नाष्ट्याचे पदार्थ हे चढ्या दराने विकले जातात. सामान्य ग्राहकांना हे दर परवडणारे नसतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची लुट थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने एक दमदार ऑफर आणली होती.एसटी महामंडळाने अधिकृत केलेल्या हॉटेल किंवा धाब्यावर केवळ 30 रुपयांत प्रवाशांना नाष्टा उपलब्ध करून दिला जात होता. ही योजना आता मात्र सुरु नाहीये.
गेले काही दिवस सोशल मिडीयावर या योजनेची माहिती देणारे पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. अनेक प्रवाशांनी एसटीने प्रवास करत असताना या योजनेबद्दल हॉटेल चालकांना विचारणा केली, परंतु त्यांना नकारात्मक उत्तर मिळाले. ही योजना बंद झाल्यामुळे आता सामान्य प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.
हॉटेल आणि धाब्यावर प्रवाशांकडूनअन्नपदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. एसटी थांबा असलेल्या हॉटेल आणि धाब्यांवर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना, चहा सरासरी 20 रुपयांना तर इडली आणि मेदूवडे 60 रुपये प्लेट प्रमाणे मिळते आहे. पोहे, उपमा, शिरा देखील 30-40 रुपये प्लेट या दराने विकले जात आहेत.
नाष्टा लूट थांबवणारी काय होती योजना?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 8 जुलै 2016 रोजी प्रसिध्द केलेल्या निवेदनात या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली होती. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने ही योजना लागू करण्यात आली होती.या योजनेनुसार महामंडळाच्या अधिकृत थांब्यांवर केवळ 30 रुपयांत नाष्टा आणि चहा प्रवाशांना खरेदी करता येत होता. म्हणजेच एसटीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येत होता.
एसटी महामंडळाने याबाबत हॉटेल आणि धाबा मालकांशी एका वर्षाचा करार केला होता. परंतु कोरोना काळात वाहतूक बंद असल्यामुळे या योजनेचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे ही योजना सध्या कार्यान्वित नाही.
या योजनेत शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली आणि मेदू वडा यापैकी कुठलाही एक पदार्थ आणि सोबत चहा केवळ तीस रुपयांत खरेदी करता येत होता.
योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. अनेक लोक सुट्ट्यांमध्ये गावी जात असतात. एसटी प्रवासासाठी सध्या प्रचंड गर्दी असून होते व्यावसायिकांनी देखील अन्नपदार्थांच्या दरात भाववाढ केली आहे.
महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत आणि 75 वर्षे वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत राज्य सरकारने लागू केली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत 30 रुपयांत नाष्टा देणारी एसटी महामंडळाची योजना पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी सामान्य प्रवासी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर, ही योजना पुन्हा सुरु करावी आणि चढ्या दराने अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेल आणि धाबा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
जास्त पैसे आकारणाऱ्या हॉटेलवर होईल कारवाई
जादा पैसे आकारणाऱ्या हॉटेल किंवा धाब्यांवर महामंडळाने कारवाईचे देखील प्रावधान केले आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास सदर ‘थांबा’ रद्द देखील होऊ शकतो. प्रवाशी 022-23075539 या क्रमांकावर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात.
हॉटेल चालकांनी वाजवी दरातच नाष्ट्याचे पदार्थ प्रवाशांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या हॉटेलची देखील तुम्ही वर दिलेल्या क्रमांकावर तक्रार करू शकता.