Budget 2023 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्पात अग्निवीरांना करामध्ये मोठी सवलत दिली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्यामध्ये भरती करण्यात येते. आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अग्निवीर कॉर्पस फंडाला EEE श्रेणी अंतर्गत आणण्याची घोषणा केली आहे. EEE श्रेणी म्हणजे अग्निवीर किंवा सरकारच्या बाजूने कॉन्ट्रिब्यूशन केले जाईल, यावर व्याजही मिळेल जे करमुक्त असेल. त्याच वेळी, जेव्हा संपूर्ण रक्कम अग्निवीरांना मिळेल, तेव्हा त्यावरही कर भरावा लागणार नाही.
अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा अर्थ काय?
अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्यात भरती करण्यात येते. या योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ही भरती केली जाते. या 4 वर्षांमध्ये त्यांना मासिक वेतना व्यतिरिक्त हार्डशिप अलाउन्स, प्रवास भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि आरोग्य सुविधा मिळतात. 4 वर्षांनंतर 75 टक्के अग्निवीर हे निवृत्त होतील आणि त्यांना 11.71 लाख रुपयांचे 'सेवा निधी' पॅकेज दिले जाईल, ज्यामध्ये 4 वर्षांच्या व्याजाचा समावेशही असणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण निधी करमुक्त ठेवण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला आहे.
काय आहे अग्निपथ योजना?
केंद्र सरकारने सैन्यात भरती करण्यासाठी ही योजना आणली असून, त्याअंतर्गत चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती केली जाते. चार वर्षांनंतर या प्रशिक्षित अग्निवीरांपैकी केवळ 25 टक्के अग्निवीरांना पुढील 15 वर्षे सैन्यात ठेवण्यात येईल आणि 75 टक्के निवृत्त होतील. या योजनेंतर्गत भूदल, हवाई दल आणि नौदल या पदांसाठी भरती केली जाईल. चार वर्षांमध्ये अग्निवीरांना पगार आणि बचतीचा लाभ EPF/PPF मध्ये मिळतो. चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज म्हणून 11.71 लाख रुपये मिळतील. याशिवाय 48 लाखांचे विमा संरक्षणही मिळेल. विशेष बाब म्हणजे एकदा भरती झाल्यानंतर अग्निवीरला अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच विशेष परिस्थितीत नोकरी सोडण्याची परवानगी दिली जाईल.