देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) पुढील आर्थिक वर्षात 1.25 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत किंचित घट झाल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली आहे.
TCS कडून सांगण्यात आले की, गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही जलद भरती केली आहे. मात्र, मागणीच्या अभावामुळे डिसेंबर तिमाहीत कर्मचारी संख्या 2 हजार 197 नी कमी होऊन 6 लाख 13 हजार 974 वर आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, "आम्ही समान स्तरावर भरती करत आहोत. पुढील आर्थिक वर्षात 1.25-1.50 लाखांची भरती केली जाईल. 2021-22 मध्ये कंपनीने 1.03 लाख नवीन लोकांना नोकऱ्या दिल्या. 2022-23 मध्ये आतापर्यंत सुमारे 55,000 लोकांची भरती करण्यात आली आहे.
निव्वळ नफा 11 टक्क्यांनी वाढून 10 हजार 846 कोटी रुपयांवर
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत TCS चा निव्वळ नफा 11 टक्क्यांनी वाढून 10 हजार 846 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत निव्वळ नफा 9 हजार 769 कोटी रुपये होता. परकीय चलनाच्या कमाईत वाढ झाल्याने नफा वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. एकूण महसूल 19.1% वाढून 58 हजार 229 कोटींवर पोहोचला आहे. TCS ने 67 रुपयांचा विशेष लाभांश आणि 8 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
Goldman Sachs 3,000 लोकांना काढून टाकणार
Goldman Sachs आपल्या अनेक कंपन्यांमधील 3 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. मंदीचा अंदाज घेऊन कंपनी त्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हा आकडा अजून जास्त असू शकतो. ब्लूमबर्गचा दावा आहे की 3 हजार 200 लोकांना कामावरून काढले जाऊ शकते. दुसरीकडे, कंपनीचे गुंतवणूक बँकिंग शुल्क 2022 मध्ये जवळपास निम्म्याने घसरून 77 अब्ज डॉलर इतके होईल.