सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही म्युच्युअल फंडमध्ये नियमित आणि शिस्तपद्धतीने गुंतवणूक करण्याची एक सोपी पद्धत आहे. ज्याद्वारे तुम्ही कमीतकमी पैशांमध्ये गुंतवणूक करू शकता. तर दुसरीकडे फिक्स डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय आहे. जिथे लोक ठराविक मुदतीसाठी विशिष्ट रक्कम जमा करू शकतात आणि मुदत संपली की मूळ रकमेवर व्याजासह पैसे परत मिळतात.
Table of contents [Show]
एफडी (मुदत ठेवी) म्हणजे काय? What is Fixed Deposit?
फिक्स डिपॉझिट किंवा एफडी हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. जो लोकांना एका निश्चित मुदतीसाठी एकरकमी रक्कम ठेवण्याचा पर्याय देतो. बॅंक आणि नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपन्या एफडीची सेवा देतात. तुम्ही एकदा का एफडी काढली की ती बंद करता येत नाही. म्हणजे ती तोडता येत नाही. तसेच केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण यासाठी बॅंका आणि नॉन-बॅंकिंग कंपन्या चार्ज घेतात. मुदत ठेवीचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यात गुंतवलेली संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज असे दोन्ही गुंतवणूकदाराच्या बॅंक खात्यात जमा होते.
बॅंका आणि नॉन-बॅंकिंग कंपन्यांकडून विविध प्रकारच्या मुदत ठेवींच्या सेवा दिल्या जातात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार एफडीचा प्रकार निवडू शकता.
एसआयपी म्हणजे काय? What is SIP?
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे; जो कमीतकमी पैशांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची पहिली पायरी म्हणून तुम्ही एसआयपीकडे पाहू शकता. एसआयपी ही एक स्पेसिफिक केंद्रित गुंतवणूक मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदाराच्या सोयीनुसार पैसे गुंतवता येतात. SIPद्वारे तुम्ही भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण करू शकता. घर किंवा गाडी खरेदी, मुलांच्या उच्च शिक्षणाचे नियोजन अशी उद्दिष्टे SIP द्वारे पूर्ण होऊ शकतात. एसआयपीमध्ये किमान 500 रुपये तर काही फंडमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
एफडीमधून मिळणार फायदे (Benefits of FD)
- खात्रीशीर परताव्याची हमी
- जोखीममुक्त गुंतवणूक
- एफडीची रक्कम आणि त्यावरील मुदतीच्या आधारे कर्ज मिळू शकते
- ओव्हरड्राफ्ट काढण्याची सुविधा
- आपत्कालीन परिस्थितीत बंद करता येते
- एफडीवर कार लोनसाठी अर्ज करता येतो
- एफडी वापरून क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतो
- 5 वर्षांच्या एफडीवर टॅक्स बेनिफिट लागू
एसआयपीमधून मिळणार फायदे (Benefits of SIP)
- गरजेनुसार गुंतवणूक करण्याची सुविधा
- एसआयपी सुरू करणं खूपच सोपं
- कमीतकमी पैशांपासून गुंतवणूक करता येते
- व्याजदर चेक करण्याची गरज नाही
- एसआयपी गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळू शकते
- एफडीप्रमाणे एकरकमी पैसे गुंतवण्याची आवश्यकता नाही
- कधीही आणि कितीही पैसे गुंतवण्याची मुभा
- एसआयपीमधून पैसे लगेच काढण्याची सोय
गुंतवणुकीची रक्कम (Investment Amount)
एसआयपी आणि एफडीचे स्वत:चे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे. एसआयपीचा एक अतिरिक्त फायदा असा आहे की, यामध्ये तुम्ही कमीतकमी रकमेने गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक प्रत्येक महिन्याला किंवा 3 महिन्यांनी सुद्धा करता येऊ शकते. त्या तुलनेत एफडीमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते. पण एकदा गुंतवणूक केली की, त्याकडे पुन्हा पाहण्याची गरज नाही. त्यावर ठरलेला परतावा निश्चितपणे मिळतो.
व्याज दर (Interest Rate)
SIP मधून मिळणारा व्याजदर हा FD पेक्षा जास्त असतो. पण तो सर्वोत्तम परतावा देण्याची खात्री देत नाही. हा परतावा बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर निश्चित परतावा मिळण्याची खात्री असते.
टॅक्स (Tax)
टॅक्स सेव्हिंग हा सर्वांसाठी महत्त्वाचा विषय आहे. किमान रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेच्या एफडीवर बॅंकांकडून टीडीएस (TDS) कापला जातो. तर SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यावर फक्त काही टक्के टॅक्स आकारला जातो. काही फंड हे स्पेशली टॅक्स सेव्हिंगसाठी असतात. त्यावर टॅक्स आकारला जात नाही.
गुंतवणूक करणाऱ्यांसाठी FD हा पर्याय सुरक्षित वाटत असला तरी त्यावर मिळणारे व्याज किंवा एफडीमधून होणारी पैशांची वाढ ही एसआयपीच्या तुलनेत कमी प्रमाणात असू शकते. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्यातील जोखीम पूर्णपणे समजून घेणं हे ही तितकंच गरजेचं आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त केलेली मते ही महामनी डॉट कॉमची ही वैयक्तिक मते नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लांगारांची मदत घ्या.)