महावीर जयंतीच्या सुटीनंतर बुधवारी शेअर बाजाराला सुरुवात झाली आहे ती तेजीने. सकाळच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक तसंच बाँबे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्समध्ये साधारण 1 टक्क्यांची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक तर 17,500 च्या आकड्याला स्पर्शून आला. दिवसभर या आकड्याच्या वर निर्देशांक टिकला तर शेअर बाजारासाठी हे चांगलं चिन्ह असेल. तर सेन्सेक्स साडे दहा वाजता 59,500 च्या आसपास आहे. इथंही 59,500 ची पातळी महत्त्वाची आहे.
रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य, जागतिक बाजारात सोन्याचे भाव हे घटक मात्र शेअर बाजाराला अनुकूल नाहीत. कारण, अमेरिकन डॉलर रुपयाच्या तुलनेत आता 82.07 पर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीही आंतरराष्ट्रीय बाजारात 81 अमेरिकन डॉलर प्रती बॅरलच्या वर गेल्या आहेत.
या सगळ्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात ठरावीक शेअरमध्ये दिसून येत आहे. बजाज फायनान्स, HDFC बँक यासारख्या वित्तीय कंपन्यांचे शेअर दिवसाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नवीन रेपो दरांची घोषणा गुरुवारी होणार आहे. आणि यंदाही मध्यवर्ती बँक 0.25 अंशांनी हे दर वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये दिसून येत आहेत. या शेअरमध्ये तेजी आहे. तर केंद्रसरकारने तेलावरचा विंडफॉल कर कमी केल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांच्या शेअरना आज मागणी आहे. ONGC, HPCL, BPCL असा कंपन्यांचे शेअर वर आहेत.
माहिती तंत्रज्ञान, धातू या शेअरमध्ये मात्र सलग तिसऱ्या दिवशी मंदी दिसून येत आहे.
काय होती सोमवारच्या मार्केटची स्थिती?
4 एप्रिल मंगळवार रोजी भारतीय शेअर मार्केट महावीर जयंतीनिमित्त बंद होते. मात्र सोमवार 3 एप्रिलचे शेअर मार्केट हे वाढत्या अंकांनी बंद झाले होते. यावेळी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक 114 अंकांनी (Senex) वाढला आणि 59,106 अंकांवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 38 अंकांच्या वाढीसह 17,398 वर बंद झाला होता.
RBI च्या पत धोरणाची प्रतीक्षा?
महत्वाचे म्हणजे 6 एप्रिल रोजी RBI पतधोरणाचा द्विमासिक आढावा घेणार आहे. म्हणजे उद्या नवीन रेपो रेट जाहीर होतील. आणि अर्थतज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, रेपो दरात वाढ करण्याचंच धोरण आताही कायम राहील. साधारण 0.25 अंशांची वाढ बाजाराला अपेक्षित आहे. त्यामुळे बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर सगळ्यांचं लक्ष असेल.