Share Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.19 डिसेंबर) सेन्सेक्स 468 अंकांनी वाढला. तर निफ्टी 50 मध्ये 151 अंकांची वाढ होऊन तो 18420 वर बंद झाला. सोमवारी सकाळपासून मार्केटमध्ये खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला. खरेदीदारांनी ऑटो, एफएमसीजी आणि रिअल्टी कंपन्यांच्या शेअर्सला पसंती दिल्याचे दिसून आले. यामुळे आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे 2.55 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
Table of contents [Show]
बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांच्या भांडवलात वाढ!
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील (Bombay Stock Exchange-BSE) लिस्टेड कंपन्यांच्या भांडवलामध्ये सोमवारी वाढ झाली आहे. या कंपन्यांचे भांडवल आज 288.01 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जे शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) बाजार बंद होताना 285.46 लाख कोटी रुपये होते. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज अंदाजे 2.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
‘या’ 5 शेअर्समध्ये दिसून आली सर्वाधिक वाढ!
सेन्सेक्समधील (Sensex) 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज वाढ होऊन बंद झाले. ज्या 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. त्यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra), पावर ग्रीड (Power Grid), भारती एअरटेल (Bharti Airtel), बजाज फिनसर्व (Bajaj Finserve) आणि एचडीएफसी (HDFC) या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी 1.75 टक्क्यांपासून 2.97 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
सेन्सेक्समधील ‘हे’ 5 शेअर्स आपटले!
सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच खरेदी झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या भांडवलात चांगलीच वाढ झाली. पण दुसरीकडे 5 कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीसह बंद झाले. त्यात टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), टाटा मोटर्स (Tata Motors), सन फार्मा (Sun Pharma) आणि इंडसइंड बॅंक (IndusInd Bank) यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे शेअर्स 0.47 टक्क्यांपासून 1.07 टक्क्यांपर्यंत खाली आले.
325 कंपन्यांच्या शेअर्सला लागला अप्पर सर्किट!
बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोमवारी एकूण 325 कंपन्यांच्या शेअर्सने अप्पर सर्किटला टच केले. ज्या कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटला गेले, त्यामध्ये बजाज हिंदुस्तान शुगर (Bajaj Hindustan Sugar), एक्सिसकॅड्स टेक्नोलॉजी (Axiscades Technology, जिंदाल पॉली इन्वेस्टमेंट (Jindal Poly Investment), शेमारू एंटरटेनमेन्ट (Shemaroo Entertainment), एसआईएल इन्वेस्टमेंट (SIL Investment) आणि पार्ल टेक्नॉलॉजीस् (Palred Technologies) यांचा समावेश आहे. तर फक्त 179 शेअर्स लोअर सर्किटपर्यंत पोहोचले.