कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये सुरूवातीपासूनच शेअर मार्केटमध्ये (Share Market) अस्थिरतेचं वातावरण होतं. असे असतानाही यावर्षी आलेल्या आयपीओने (IPO) मार्केटमध्ये खळबळ उडाली होती. यात एलआयसीचा (LIC) सर्वांत मोठा हात होता. येणाऱ्या काळात अनेक कंपन्यांचे आयपीओ पाईपलाईनमध्ये आहेत. गेल्या 6 महिन्यांच्या काळात मार्केटमधील अनिश्चतता आणि एलआयसीच्या निराशेनंतर मार्केटमधला उत्साह आणखीच खाली गेला. पण आता पुन्हा एकदा सेन्सेक्सने (Sensex) 60 हजारांचा टप्पा गाठल्याने खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ येत्या काळात लॉण्च करण्याची तयारी सुरू केली.
अनेक कंपन्या ‘आयपीओ’च्या पाईललाईनमध्ये!
डिजिट इन्श्युरन्स (Digit Insurance), कॉनकॉर्ड बायोटेक (Concord Biotech), ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस (Dreamfolks Services) आणि बालाजी सोल्युशन्स (Balaji Solutions) या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या मार्गावर आहेत. म्युच्युअल फंडातील अनेक फंड हाऊसचे नवीन फंड ऑफर (New Fund Offer-NFO) तीन महिन्यांच्या कालावधीने आले आहेत. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडाच्या नवीन किमान 24 ऑफर आल्या होत्या.
डिजिट इन्श्युरन्सने (Digit Insurance)
डिजिट इन्श्युरन्सने (Digit Insurance) 16 ऑगस्ट, 2022 रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. ही कंपनी आयपीओमध्ये 1,250 कोटी रूपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे डिजिट कंपनी 10.94 कोटी शेअर्स विकणार आहे. दरम्यान, कंपनी 5 हजार कोटी रूपयांचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.
डिजिट इन्श्युरन्स कंपनी मोटार विमा, आरोग्य विमा, ट्रॅव्हल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, मरिन इन्शुरन्स, लायब्लिटी इन्शुरन्स आणि इतर इन्श्युरन्स प्रोडक्टसची विक्री करते. डिजिट कंपनीचा इन्श्युरन्स मार्केटमध्ये 2.4 टक्के वाटा आहे. 2021-22 या वर्षात डिजिट इन्श्युरन्सच्या तोट्यात वाढ झाली होती. तर गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा 295.8 कोटी रूपयांचा तोटा झाला होता.
कॉनकॉर्ड बायोटेक (Concord Biotech)
कॉनकॉर्ड बायोटेक (Concord Biotech) ही अहमदाबाद येथील कंपनी बायोटेक कंपनी आहे. या कंपनीत दिवंगत राकेश झुनझुनवाला (Late Rakesh Jhunjhunwala) यांची सुद्धा गुंतवणूक आहे. कॉनकॉर्ड कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली असून याचा आयपीओ पूर्ण विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हेलिक्स इन्वेस्टमेंट होल्डिंग हे कॉनकॉर्ड बायोटेकचे प्रवर्तक असून ते त्यांच्याकडील संपूर्ण 20 टक्के भाग विकणार आहेत. क्वाड्रिया (Quadria)ने 2016 मध्ये कॉनकॉर्ड बायोटेकमध्ये 475.30 कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.
बालाजी सोल्युशन्स (Balaji Solutions)
बालाजी सोल्युशन्स (Balaji Solutions) ही आयटी हार्डवेअर आणि मोबाईल अक्सेसरीजचे वितरण करणारी कंपनी आहे. यांनीही सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला. कंपनी आयपोओद्वारे 120 कोटी रूपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. 75 लाख शेअर्स ऑफर्स फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत. राजेंद्र सक्रिया हे वैयक्तिक 15 लाख तर हिंदू अविभक्त कुटुंब (HUF)तून 60 लाख शेअर्स विकणार आहेत.
ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस (Dreamfolks Services)
ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस (Dreamfolks Services) ही कंपनी भारतातील विमानतळांवर लाऊंज सेवा देते. या क्षेत्रातील ही भारतातील मोठी कंपनी मानली जाते. ड्रीमफोल्क्स या महिन्यात आयपीओ आणणार आहे. 24 ऑगस्ट रोजी आयपीओ ओपन होणार असून 26 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील.