मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. एसबीआय सिक्युरिटीजने आगामी सम्वत 2082 साठी 15 मजबूत शेअर्सची यादी जाहीर केली आहे. या शेअर्समध्ये पुढील काही महिन्यांत 25% पर्यंत वाढ होण्याची शक्यता ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. व्याजदर कपात, कर प्रोत्साहन आणि आर्थिक धोरणांमुळे बाजारात तेजी परत येईल, असा त्यांचा अंदाज आहे.
या निवडीत बँकिंग, ऑटो, इंजिनिअरिंग, हेल्थकेअर आणि मेटल्ससह विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रात एचडीएफसी बँक (लक्ष्य ₹1,110) आणि इंडियन बँक (लक्ष्य ₹875) या शेअर्सकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे, असे मत देण्यात आले आहे. दोन्ही बँकांकडून कर्जवितरण आणि नफा वाढीचा मजबूत ट्रेंड अपेक्षित आहे.
ऑटो क्षेत्रात टीव्हीएस मोटर, अशोक लेलँड, सुब्रोस, फाईम इंडस्ट्रीज आणि स्वराज इंजिन्स या कंपन्यांना चांगली वाढ मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण मागणी आणि जीएसटीमधील बदल हे प्रमुख उत्प्रेरक ठरणार आहेत.
इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग विभागात आझाद इंजिनिअरिंग, ओस्वाल पंप्स आणि पॉन्डी ऑक्साईड्स अँड केमिकल्स यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे महसूल आणि नफा दरवर्षी दहापट वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेल्थकेअर क्षेत्रात अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर 13% पर्यंत वाढीची क्षमता ठेवतो. तसेच ज्युबिलंट फुडवर्क्समध्ये उपभोग वाढीचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
मेटल क्षेत्रातील नॅल्को आणि इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयस (IMFA) हे शेअर्स उत्पादनवाढ आणि खर्चकपातीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.
एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, सध्याचा बाजार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल टप्प्यात असून, योग्य निवड केलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना आगामी वर्षात “शुभ परतावा” मिळण्याची संधी आहे.