आयपीओची (IPO) खूप चर्चा झाली. आयपीओ (Initial Public Offering) डिमॅट खात्यात येणं म्हणजे सिनेमाच्या फर्स्ट डे, फर्स्ट डेची तिकिटं मिळणं. हो, असाच आनंद, हां जर तो चांगल्या कंपनीचा आणि भविष्यात छप्पर फाडके रिटर्न देणाऱ्या कंपनीचा असेल तर. म्हणून आयपीओ म्हणजे काय हे पाहू. कोणत्याही कंपनीला आपल्या व्यवसाय विस्तारासाठी, कर्जफेडीसाठी वगैरे निधीची गरज भासत असते. बँका वा वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन, कंपनीतील हिस्सा भागीदार आदींना विकून ती पूर्ण केली जाते. याउपरही कंपनीचे काही शेअर खुल्या बाजारात (open market) छोट्या व मोठ्या संख्येतील गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिले जातात.
IPO म्हणजे काय (Initial Public Offering)
निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.
IPO चे प्रकार
जी कंपनी लोकांना शेअर्स जारी करते तिला जारीकर्ता म्हणून संबोधले जाते. IPO चे दोन सामान्य प्रकार आहेत.
1) निश्चित किंमत ऑफर (fixed price)
या प्रकारात IPO ला काही कंपन्यांनी त्यांच्या शेअर्सच्या प्रारंभिक विक्रीसाठी सेट केलेली इश्यू किंमत म्हणून संदर्भित केले जाऊ शकते.
2) बुक बिल्डिंग ऑफर (book building)
बुक बिल्डिंग ऑफर मध्ये IPO सुरू करणारी कंपनी गुंतवणूकदारांना स्टॉकवर 20% किंमतपट्टा (price band) ऑफर करते. अंतिम किंमत ठरवण्यापूर्वी इच्छुक गुंतवणूकदार शेअरवर बोली लावतात.
IPO चा कंपनीला काय फायदा होतो ?
IPO लहान आणि मध्यम उद्योग (SME), स्टार्टअप (Start-up) आणि इतर नवीन कंपन्या त्यांच्या विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, सुधारण्यासाठी वापरतात. आयपीओ हा कंपन्यांसाठी नवीन भांडवल मिळविण्याचा एक मार्ग आहे, ज्याचा उपयोग संशोधनासाठी वित्तपुरवठा, भांडवली खर्च, निधी, कर्ज कमी करण्यासाठी आणि इतर संधी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. आयपीओमुळे कंपनीच्या कारभारात पारदर्शकता येईल कारण आर्थिक आकडे आणि बाजाराशी संबंधित इतर घडामोडी शेअर बाजाराला (stock exchange) वेळेवर कळवाव्या लागतील. विविध इक्विटी (equity) आणि बाँड (bond) साधनांमधील कंपनीची गुंतवणूक सूचीबद्ध झाल्यानंतर अधिक छाननीखाली येईल. कोणत्याही कंपनीचा IPO मोठ्या प्रमाणावर लक्ष आणि विश्वासार्हता आणतो. जगभरातील विश्लेषक ग्राहकांच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर अहवाल देत असतात.
IPO मध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या
IPO वर गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार जर सजग असतील आणि काही तज्ज्ञ असतील तर ते अधिक परतावा (return) मिळवू शकतात. आयपीओ बाजारात आणणाऱ्या कंपन्यांच्या माहिती पत्रकामधून (prospect) गुंतवणूकदार निवड करू शकतात. कंपनीच्या व्यवसाय योजना आणि बाजारातील स्टॉक वाढवण्याच्या हेतूबद्दल माहितीपूर्ण कल्पना तयार करण्यासाठी त्यांना IPO prospect काळजीपूर्वक पाहावे लागेल. तथापि, आयपीओ मधील संधी हेरण्यालाठी एखाद्याने तेवढेच सावधही असले पाहिजे. आर्थिक बाबींशी संबंधित कडेवारीचे विश्लेषण करण्याची स्पष्ट समज गुंतवणूकदाराला असणे आवश्यक आहे. आयपीओ ही बाजारात प्रत्यक्ष व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या शेअरसाठी गुंतवणूकदाराने आधीच केलेली नोंदणी असते. कंपनी, तिचे अस्तित्व, तिची उत्पादने वा सेवा, ग्राहक-नफा तसेच कंपनीची आर्थिक स्थिती (balance sheet) यावर आयपीओला गुंतवणूकदार प्रतिसाद देतात.
केवळ IPO वर आपले मत बनवून व्यवहार करणे गुंतवणूकदारांसाठी जोखमीचे (risk) आहे. आयपीओ न मिळालेल्यांना प्रत्यक्ष बाजारातही शेअरचे मूल्य बघून गुंतवणूक करू शकता. सर्व बाबींचा विचार कारण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.