सध्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत आहे; कारण ही तसंच आहे. कारण भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ (LIC IPO) बाजारात आला आणि त्यावर गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारकांचीही झुंबड उडाली. एलआयसीने सर्वाधिक 6 दशलक्ष अर्जांचा विक्रम निर्माण झाला. आयपीओमध्ये प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनीही याला भरघोस प्रतिसाद दिला. यापूर्वी सर्वाधिक सबस्क्रिप्शन करण्याचा विक्रम रिलायन्स पॉवर (Reliance Power)च्या आयपीओकडे होता. त्यांच्याकडे आयपीओसाठी 14 वर्षांपूर्वी 4.8 दशलक्ष अर्ज आले होते.
पण असे मागणी असलेले आणि सबस्क्रिप्शनच्या संख्येने मोठे असलेले आयपीओ (IPO) खरंच गुंतवणुकीसाठी योग्य असतात का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण सध्या भांडवली बाजारात लिस्टिंग झालेल्या एलआयसीने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. एलआयसीचे शेअर्स (LIC Shares) मंगळवारी 17 मे रोजी सवलतीच्या दरात लिस्ट झाले. बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला. अशाच आतापर्यंत सर्वार्थाने मोठ्या ठरलेल्या आयपीओंबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती घेणार आहोत.
1. केयर्न इंडिया लिमिटेड (Cairn India Ltd)
केयर्न इंडिया लिमिटेड कंपनीचा 8,616 कोटींचा आयपीओ (IPO) 11 ते 15 डिसेंबर, 2006 या दरम्यान आला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. कंपनी गैर-संस्थात्मक (non-institutional) आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना (individual investors) आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. आयपीओच्या इश्यूला 1.14 पट सबस्क्रायबर मिळाले. लिस्टिंगच्या दिवशी केयर्नचा शेअर 12 टक्क्यांनी सवलतीच्या 160 रूपयांवर सूचीबद्ध झाला आणि दिवसअखेरीस तो 14 टक्क्यांनी घसरून 137.50 रूपयांवर बंद झाला. शेवटी ही कंपनी 2017 मध्ये कर्जबाजारी झालेली पालक कंपनी वेदांतमध्ये विलीन झाली आणि स्टॉक डीलिस्ट करण्यात आला. शेअर मार्केटमधील व्यापाराच्या शेवटच्या दिवशी केयर्नच्या शेअर्सची किंमत बीएसईवर 285.40 रूपये नोंदवली गेली होती.
2. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (HDFC Life Insurance Co Ltd)
नोव्हेंबर, 2017 मध्ये एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ 275-290 या प्राईस बॅण्डने बाजारात आला होता. त्याचा एकूण व्हॉल्यूम 8,695 कोटी एवढा होता. त्यावेळी त्याचे सबस्क्रिप्शन 4.8 पट झाले होते. त्याच्या प्रीमियमध्ये 7 टक्क्यांनी वाढ होऊन शेअर मार्केटमध्ये तो 311 रूपयांवर सूचीबद्ध झाला. सध्या एचडीएफसीच्या लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 564 रूपयांच्या आसपास आहे. गेल्या 5 वर्षांत याच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली.
3. डीएलएफ लिमिटेड (DLF Ltd)
2007 मध्ये आलेल्या डीएलएफ लिमिटेड कंपनीच्या आयपीओ (DLF IPO) व्हॉल्यूम 9,187.50 कोटी एवढा होता आणि त्याचे सबस्क्रिप्शन 3.47 पट झाले होते. पण तरीही किरकोळ गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत त्याचे सबस्क्रिप्शन फक्त 0.98 पट होते. लिस्टिंगवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियमवर सूचीबद्ध झालेला हा शेअर पुढील काही महिन्यांत 1,205 रूपयांपर्यंत गेला होता.
दरम्यान, 2016 मध्ये डीएलएफच्या शेअरमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आणि त्याची किंमत 80 रूपयांवर आली. सध्या त्याची किंमत 318 रूपये या दरम्यान आहे. पण तरीही तो गेल्या 15 वर्षातील किमतीच्या तुलनेत अजूनही 39.43 टक्क्यांनी पिछाडीवरच आहे. हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो.
4. झोमॅटो लिमिटेड (Zomato Ltd)
अल्पावधीत भारतातील अग्रगण्य अन्न वितरण कंपनी (Food Delivery Company) म्हणून नावारूपास आलेल्या झोमॅटो कंपनीचा आयपीओ जुलै 2021 आला होता. याचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होताना प्रीमिअममध्ये 52.63 टक्के वाढ नोंदवून तो 116 रूपयांवर सूचीबद्ध झाला. ज्याची ऑफर किंमत फक्त 76 रूपये होती. काही महिने उच्चांकावर असलेल्या झोमॅटोच्या स्टॉकमध्ये जोरदास घसरण होत गेली. सध्या यात 68 टक्क्यांनी घसरण झाली असून त्याची सध्याची किंमत 54 रूपये आहे.
5. दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड ( The New India Assurance Co Ltd)
2017 मध्ये आलेल्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओचा व्हॉल्यूम 9,600 कोटी रुपये होता. आयपीओ (IPO) मधील किरकोळ आणि उच्च निव्वळ मूल्य असलेल्यांकडून (high net-worth individuals - HNI) सबस्क्रिप्शन कमी झाले होते. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे हा आयपीओ स्क्रॅप झाला आणि इश्यूच्या शेवटच्या दिवशी त्याचे 1.19 पट सबस्क्रिप्शन झाले. एलआयसीने 6,500 कोटी रूपयांची लावली होती. भांडवली बाजारात 50 रूपयांच्या सवलतीसह लिस्टिंग झालेल्या या शेअर्सची किंमत वर्षभरात 50 टक्क्यांनी कमी झाली. सध्या याची किंमत 104 रूपयांच्या आसपास आहे.
6. एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (SBI Cards & Payment Services Ltd)
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा शेअर, त्याच्या प्राईस बॅण्डच्या (755 रूपये) 12.85 टक्क्यांपेक्षा खाली येत 658 रूपयांवर लिस्टिंग झाला होता. तर दिवस अखेरीस बीएसईवर 683 रूपयांवर बंद झाला होता. गेल्या वर्षी हा शेअर 1,141 रूपयांवर पोहोचला होता. सध्या याची किंमत 715 रूपयांच्या जवळपास आहे.
7. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( General Insurance Corporation of India Ltd)
विमा कंपन्यांमधील शेअर्सचा कमकुवत लिस्टिंगच्या कामगिरीचा ट्रेंड सुरूच आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर्ससुद्धा ऑक्टोबर, 2017 मध्ये पदार्पणातच निश्चित केलेल्या किमतीपेक्षा 6 टक्क्यांनी घसरला होता. या आयपीओपासून किरकोळ गुंतवणूकदार आणि HNI (high net-worth individuals) दूरच राहिले होते. 912 रूपये इश्यू प्राईस असलेल्या या शेअर्सची सध्या किंमत 114 रूपयांच्या आसपास आहे.
8. रिलायन्स पॉवर लिमिटेड (Reliance Power Ltd)
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर 11 फेब्रुवारी, 2008 मध्ये भांडवली बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी कंपनीने आयपीओच्या माध्यमातून विक्रमी असे 11,563 कोटी रूपये जमा केले होते. शेअर्सच्या ग्रे मार्केट प्रीमियममधील 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यावेळी या शेअर्सने अभूतपूर्व असा टप्पा गाठला होता. पण कालांतराने याच्या मोठ्या प्रमाणात घसरण होत गेली. याच्या शेअर्समध्ये आयपीओ इश्यूच्या किमतीपेक्षा 95 टक्क्यांनी घसरण झाली. 450 रूपयांवरून त्याची किंमत 13 रूपयांवर आली.
9. कोल इंडिया लिमिटेड (Coal India Ltd)
2010 मध्ये, कोल इंडिया लिमिटेड कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 15,475 कोटी उभारले होते. हा त्यावेळी भारतातील सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता. या आयपीओने लिस्टिंगच्या वेळी 245 रूपयांच्या इश्यूमध्ये 17 टक्क्यांनी वाढ घेतली होती. दिवसअखेर तो 342.35 रूपयांवर वर बंद झाला होता. म्हणजे ऑफर किमतीपेक्षा त्यात 28.44 टक्के अधिक वाढ घेतली होती. अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक स्टार परफॉर्मर ठरला, पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी तो परतावा देण्यास अयशस्वी ठरला आहे. सध्या हा शेअर 170 रूपयांच्या आसपास आहे.
10. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम)
वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचा म्हणजेच पेटीएमचा आयपीओ 18,300 कोटींचा होता. एलआयसीपूर्वीचा सर्वांत मोठा आयपीओ पेटीएमचाच होता. 18 नोव्हेंबर, 2021 रोजी बाजारात पदार्पण केल्यानंतर काही तासांत या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संपत्ती 35,000 कोटींनी कमी झाली होती. 2150 रूपये इश्यू प्राईस असलेला शेअर एनएसईवर 1,950 रूपयांवर सूचीबद्ध झाला होता. म्हणजे इश्यू प्राईसच्या किमतीमध्ये 9.3 टक्क्यांची घसरण झाली होती. दिवसअखेरीस तो 27 टक्क्यांनी खाली येत 1,560 रूपयांवर बंद झाला. सध्या पेटीएम शेअर्सची किंमत 517 रूपयांच्या आसपास आहे.
मोठ्या आकाराच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे?
एलआयसीचा आयपीओ येण्यापूर्वी यापूर्वीच्या सर्वांत 10 मोठ्या आयपीओंचा रेकॉर्ड पाहिला असता दहापैकी आठ आयपीओ मधील गुंतवणूकदारांना नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. आयपीओ हा अनेक नवीन गुंतवणूकदारांसाठी गोंधळात टाकणारा विषय असू शकतो. विशेषत: नवीन गुंतवणुकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, नव्याने भांडवली मार्केटमध्ये येणाऱ्या कंपन्यांचा काही रेकॉर्ड नसतो. त्यामुळे त्याचे अंदाज चुकण्याची शक्यता असू शकते. अशावेळी सेकंडरी मार्केटमधील कामगिरीवरून सदर कंपनीचे शेअर्स घेतले जाऊ शकतात.
2021 मध्ये, पेटीएम (Paytm), नायका (Nykaa) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांसह 63 कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्या. पण या 63 कंपन्यांपैकी फक्त 15 कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकल्या आहेत.
डिस्कलेमर : हा लेख फक्त माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे. यातून कोणत्याही शेअर्सची शिफारस करण्यात आलेली नाही.