Sensex Crashes: सलग 6 दिवस तेजीत राहिल्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक आज (शुक्रवार) आपटले. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कॉर्पोरेट कंपन्यांच्या सुमार कामगिरीमुळे बाजार खाली आला. काही बड्या कंपन्यांचा नफा कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरूवात केली.
स्थानिक संस्थात्मक गुंतवणुकदारांनीही बाजारातून पैसे काढून घेणे पसंत केले. दुपारी सेन्सेक्स 804 अंकांनी खाली येऊन 66,767 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टीही 1 टक्क्यांनी खाली आला. फक्त सार्वजनिक बँका, मीडिया आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणुकीला धक्का पोहचला नाही. इतर क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
बाजार कोसळण्यामागील महत्त्वाची कारणे?
आयटी जायंट इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षात नफ्याचा अंदाज 4-7 टक्क्यांवरुन 1 ते 3.5 टक्क्यांच्या दरम्यान राहील, असे जाहीर केले. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. इतर आयटी कंपन्यांच्या शेअरवरही याचा परिणाम झाला.
इन्फोसिसचा शेअर आज 8 टक्क्यांनी खाली आला. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी इन्फोसिस शेअर खेरदीची ही योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्सही कोसळला. काल (गुरुवार) कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीमधून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी वेगळी काढली. या डिमर्जरचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला.
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी पहिल्या तिमाहीत अपेक्षित नफा गाठू शकली नाही. स्थानिक बाजारातील कंपनीची वाढ फक्त 3% राहिली. पर्सनल केअर आणि FMCG क्षेत्रातील HUL ही मोठी कंपनी आहे. कंपनीच्या निराशाजनक कामगिरीचा परिणाम भांडवली बाजारावर झाला.
अमेरिकेचा शेअर बाजार निर्देशांक नॅसडॅक काल (गुरुवार) कोसळला. नेटफ्लिक्स आणि टेस्ला कंपनीचे तिमाही निकालाने निराश केल्यामुळे अमेरिकेतील भांडवली बाजारही गडगडला. नवे वर्ष सुरू झाल्यानंतर नॅसडॅक निर्देशांक 40 टक्क्यांनी वर गेला होता. मात्र, आता निर्देशांक खाली आला आहे.