• 04 Oct, 2022 15:24

एसबीआयने लॉन्च केला फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन; गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या!

SBI Fixed Maturity Plan

SBI Fixed Maturity Plan : एसबीआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनचा (SBI FMP) कालावधी 1302 दिवसांचा आहे; त्यामुळे ही योजना एप्रिल, 2026 मध्ये मॅच्युअर्ड होईल.

SBI Fixed Maturity Plan : स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड (SBI MF) ने फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (Fixed Maturity Plan-FMP) सिरीज 68 लॉन्च केली. या योजनेचा कालावधी 1,302 दिवसांवर निश्चित केला आहे; त्यामुळे ही योजना एप्रिल 2026 मध्ये मॅच्युअर्ड होईल. ही योजना 15 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 21 सप्टेंबर 2022 रोजी बंद होणार आहे.

फिक्स मॅच्युरिटी प्लॅन (FMP) बद्दल आपल्याला माहित असेलच की, ही म्युच्युअल फंड योजनेमधील मुदत ठेव योजनेची (Fixed Deposit Scheme) कॉपी आहे. ही योजना क्लोज-एंडेड स्वरूपाची आहे. या योजनेतील निधी हा निश्चित व्याज देणाऱ्या सिक्युरिटीज योजनांमध्ये गुंतवला जातो. जेणेकरून ग्राहकांना दिलेल्या मुदतीत परतावा देता येतो. 

FMP मध्ये कोणी गुंतवणूक करावी?

ज्या गुंतवणूकदारांना एका विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे; आणि यासाठी ते वेगवेगळ्या पर्यायांच्या शोधात आहेत. तसेच कमी जोखमीसह टॅक्स सवलतीचा लाभ ज्यांना हवा आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी FMP सारख्या योजना योग्य ठरू शकतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना चांगली ठरू शकते. ज्यांना 3-4 वर्ष पैशांची गरज भासणार नाही. तसेच ते अस्थिर मार्केटचा धोका स्वीकारण्यास तयार नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना योग्य आहे, असं एसबीआयचं म्हणणं आहे.

एफएमपीमधील गुंतवणुकीचे फायदे! (Benefits of investing in FMP)

किमान व्याजदर जोखीम (Minimum Risk Rate)

FMP मध्ये कमीत कमी व्याजदराची जोखम असते. कारण फंड मॅनेजर साधारणपणे या फंडमधील रक्कम चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करत असतात. तसेच ही गुंतवलेली रक्कम मॅच्युरिटीपर्यंत ठेवतात. त्यामुळे जोखीम कमी होते.

कमी खर्च (Low Cost)

एफएमपीमध्ये ठराविक मुदतीमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे या योजनेत सिक्युरिटीजची खरेदी किंवा विक्री होत नसल्यामळे योजनेचा खर्च सुद्धा कमी होतो.

टॅक्स सवलतीचा लाभ (Taxation Benefit)

एफएमपी योजनांना इंडेक्सेशनचा लाभ मिळतो. जर योजनेचा मॅच्युरिटी कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त असेल तर योजनेतून मिळालेल्या परताव्यामधून टॅक्स मोजला जातो.

संबंधित धोके काय आहेत?

एखाद्या योजनेच्या पोर्टफोलिओ वाईट असेल तर काही सिक्युरिटीजमध्ये डिफॉल्ट होण्याची शक्यता असते. यामुळे मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक अपूर्ण माहिती आधारे करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीने अधिकृत केलेल्या आर्थिक गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन घ्या.