‘जागतिक स्तरावर भारताची नवी ओळख तयार होताना दिसतेय. आणि 21 व्या शतकावर भारत राज्य करेल असंही जगभरात लोकांना वाटतं,’ या शब्दात रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी समुहाच्या दहा हजारच्या वर कर्मचारी वर्गाला संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani Birthday) यांच्या नव्वदाव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम रिलायन्स कुंटुंब दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढच्या 25 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 50 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी मोठी होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘भारतातलं नवं युग समृद्धी, अगणित संधी आणि जीवनमानात सुखद बदल घडवणारं असेल. देशातले 1.4 अब्ज लोकांचं आयुष्य बदलेल,’ असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. कार्यक्रमात ते व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
यावर्षीचा कार्यक्रम मुकेश अंबानी यांच्यासाठीही खास होता. कारण, त्यांनी रिलायन्स समुहाची सूत्र हातात घेऊन वीस वर्षं झाली आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने दूरसंचार, टीव्ही प्रसारण अशा डिजिटल क्षेत्रातही प्रवेश केला.
‘रिलायन्स समुहाचा विस्तार वडाच्या झाडासारखा होईल. जिच्या फांद्या पसरत जातील आणि मूळ आणखी खोल जात राहतील,’ असं ते समुहाच्या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाले.
रिलायन्स समुहात यावर्षी एक महत्त्वाचा बदलही झाला. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची सर्व सूत्रं आपला मुलगा आकाश अंबानीच्या हातात सोपवली. तर रिलायन्स रिटेल उद्योगाची सूत्र मुलगी ईशा अंबानीच्या हातात सोपवली. या दोन्ही कंपन्या नवीन संचालकांच्या हाताखाली चांगली प्रगती करत असल्याचं मुकेश यांनी नमूद केलं.
आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स जिओनं 5G सेवेचा श्रीगणेशा केला आहे. तर ईशा अंबानी नेतृत्व करत असलेल्या रिलायन्स रिटेल्सने काही मोठ्या कंपन्या विकत घेऊन आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. जिओ मार्टच्या माध्यमातून रिटेल सेवा डिजिटल म्हणजे ऑनलाईनही केली आहे.
येणारं औद्योगिक युग हे नवनिर्मितीचं आणि तंत्रज्ञानातल्या नवीन शोधांचं असेल. आणि त्यासाठी रिलायन्सने तयार राहिलं पाहिजे, असं आवाहनही मुकेश अंबानी यांनी केलं.