दोन वर्ष कोव्हिडमुळे लोकांना घराबाहेर पडून क्रिकेटचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे यंदा आयपीएलच्या मॅच बघण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे 30 टक्के वाढली आहे. मुख्य म्हणजे असा अनुभव केवळ फ्लाइट्स कंपन्यांचाच नसून, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल मालकांनी देखील याबाबत आपला अनुभव शेअर केला आहे. सध्या मुलांच्या परिक्षांचा काळ सुरु आहे, असे असतांना देखील अनेक नागरिक मित्र आणि कुटुंबासोबत आपला वेळ घालविण्यास आयपीएलला प्राधान्य देत असल्याचं लक्षात येत आहे.
मागच्या दोन वर्षी आयपीएल स्पर्धेवरही कोव्हिडचे निर्बंध होते. पण, यावर्षीचा स्पर्धेचा फॉरमॅट नियमित आहे. म्हणजे प्रत्येक टीम उर्वरित 9 टीमबरोबर घरच्या मैदानावर (Home Match) तसंच दुसऱ्या टीमच्या मैदानावर (Away Match) अशा प्रत्येकी दोन मॅच खेळते आहे. आणि टीमचे पाठिराखे आपल्या टीमच्या बाहेरच्या राज्यातल्या मॅच बघण्यासाठी टीमबरोबर प्रवास करत आहेत. कारण, सध्या ज्या शहरांसाठी हॉटेल तसंच तिकीट बुकिंग होतंय ती आघाडीची शहरं आहेत, जयपूर, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद तसंच चेन्नई आणि गुवाहाटी. याच शहरांमध्ये आयपीएलच्या मॅच मोठ्या प्रमाणावर होतोय. आणि या शहरांसाठीचं प्रवासाचं बुकिंग तसंच हॉटेल बुकिंग यात वाढ झाली आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ
रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म Confirmtkt वर देखील IPL सामने आयोजित करणाऱ्या बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई आणि मुंबईसाठी जाणाऱ्या ट्रेन बुकिंगमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 21 ते 23 एप्रिलला ईदची सुट्टी असल्याने सर्वाधिक बुकींग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशाअंतर्गत प्रचंड प्रमाणात प्रवासी भाववाढ झाली असली, तरीदेखील लोक आयपीएलचा अनुभव घेण्यासाठी ट्रव्हल्स, फ्लाइट्स आणि हॉटेलवर अधिक खर्च करीत असल्याचे दृष्टिस येते आहे.
फ्लाइट्सच्या तिकिटांमध्ये दिसुन येतोय चढ-उतार
एकिकडे आयपीएलच्या काळात महत्वाच्या मार्गावरील फ्लाइट्सच्या तिकिटांच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. दिल्लीच्या नियमित भाड्याच्या तुलनेत फ्लाइट्स तिकिटांचे दर वाढले आहे. तर दुसरीकडे दिल्ली-बेंगळूरु मार्गावरील विमान भाड्यात सुमारे 15 टक्के कपात झाली आहे. आणि दिल्ली-चेन्नई मार्गावरील फ्लाइट तिकिटांच्या किंमतींमध्ये सुमारे 30 टक्के एवढी सर्वात लक्षणीय घट झाली आहे.
हॉटेल बुकिंगची मागणी 50 टक्क्यांनी वाढली
आयपीएलच्या या सिझन मध्ये हॉटेल बुकिंगची मागणी देखील 50 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली ही प्रमुख शहरे आहेत,जिथे हॉटेल बुकिंगची मागणी जास्त आहे. याबरोबरच मोहाली, अहमदाबाद, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी यांसारख्या प्रसिध्द पर्यटम स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि हॉटेल्सची मागणी प्रचंड वाढलेली दिसून येत आहे.