व्ही देशातली एक मोठी दूरसंचार कंपनी आहे. व्होडाफोन इंडिया (Vodafone) आणि आयडिया (Idea) या दोन कंपन्याचं विलीनीकरण होऊन सध्याची व्ही (VIL) कंपनी अस्तित्वात आली. मुळातच तोट्यात असल्यानं या दोन कंपन्यांचं विलीनीकरण (Merger) झालं. मात्र त्यानंतरही कंपनीचा तोटा वाढतच होता. आता कंपनीसाठी काहीशी दिलासा देणारी परिस्थिती निर्माण झालीय. जी आकडेवारी समोर आलीय, त्यात व्होडाफोन आयडियाच्या महसुलात वाढ दर्शवणारी आहे.
Table of contents [Show]
तिमाही निकाल जाहीर
कंपनीनं आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यात ही बाब स्पष्ट झालीय. कंपनीनं तिमाहीचे आकडे जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात (Share market) कंपनीच्या शेअर्समध्ये साडे तीन टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मार्च तिमाही म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीत कर्जबाजारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड (Vodafone Idea Limited) म्हणजेच व्हीआयएलनं (VIL) 6,418.9 कोटी रुपयांचा तोटा कमी केलाय.
तोटा कमी
व्हीआयएलनं शेअर बाजाराला यासंदर्भातली माहिती दिलीय. या माहितीनुसार, मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 6,563.1 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. संपूर्ण आर्थिक वर्षाबद्दलचा विचार केला तर कंपनीच्या तोट्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23मध्ये व्होडाफोन आयडियाचा तोटा वाढून 29,297.6 कोटी रुपये झाला. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा तोटा 28,234.1 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षातल्या तोट्यापेक्षा अधिक तोटा पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23मध्ये झाला. आता या तोट्यात घट झाल्याचं दिसतंय.
महसूल वाढतोय
कंपनीचा तोटा कमी होतो, तसा महसूलही वाढतोय. आर्थिक वर्षाचा विचार केल्यास व्होडाफोन आयडियानं महसुलाच्या विषयात आघाडी घेतलीय. मिळालेल्या आकडेवारीनुसार, व्हीआयएलच्या महसुलात 2022-23 या आर्थिक वर्षात 9.4 टक्क्यांनी वाढ झालीय. ती 42,133.9 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलीय. त्याचबरोबर कंपनीवरचं कर्जही घटलंय. 31 मार्चपर्यंत 2.09 लाख कोटींवर हे कर्ज गेलं होतं. डिसेंबर 2022च्या तिमाहीच्या शेवटपर्यंत ते 2.23 लाख कोटी रुपये इतकं जास्त होतं. सेवेतून कंपनीच्या कमाईत सुमारे तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. हा आकडा 10,506.5 कोटी रुपयांवर आलाय. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा 10,228.9 कोटी रुपये इतका होता.
...मात्र ग्राहक गमावले
व्होडाफोन आयडियानं तिमाहीचे जाहीर केलेले निकाल नफा दर्शवत असले तरी कंपनीनं 12 लाखांहून अधिक ग्राहक गमावलेत. ट्रायनं जाहीर केलेल्या अहवालात ही बाब समोर आली. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत एकीकडे वाढ होत असताना व्हीनं मात्र तब्बल 12 लाख ग्राहक गमावले आहेत. नेटवर्कच्या समस्या, चढे रिचार्ज दर, ग्राहक सेवेत परिपूर्णता नाही अशा विविध कारणांनी ही संख्या घटतेय. आगामी काळात कंपनीला आपलं नेटवर्क अधिक मजबूत करण्याची गरज आहे. अन्यथा आता झालेला नफा पुढच्या काळात मिळेलच, याची कोणतीही खात्री देता येणार नाही. प्रतिस्पर्धी कंपन्यांची मात्र प्रचंड नफ्याकडेच वाटचाल सुरू आहे. त्यात सातत्य असल्यानं व्हीचं टेन्शन अधिक वाढलंय.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            