Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इक्विटी म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

इक्विटी फंडामधील (Equity Schemes) गुंतवणूक सुमारे पाच पटीने वाढली असून म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

एप्रिलमध्ये शेअर मार्केटमध्ये लक्षणीय अस्थिरता असूनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांवर (Equity Schemes) विश्वास ठेवून सिस्टिमॅटिक इनव्हेसमेंट प्लॅन (SIP ) मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले. परिणामी इक्विटी म्युच्युअल फंडात 15,890 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) या संस्थेने यासंबंधित प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे की, डेब्ट (Debt) आणि इक्विटी (Equity) फंडातील गुंतवणुकीमुळे एप्रिल महिन्याच्याअखेरीस म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता आतापर्यंतच्या सर्वकालीन 38.9 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली. मार्च महिन्यात हाच आकडा 37.7 लाख कोटी इतका होता.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडवर विश्वास

एप्रिल महिन्यात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. तरीही किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडवर विश्वास ठेवल्यामुळे व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (AUM) इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकली. इक्विटीमधील गुंतवणूक मालमत्तेत वर्षभरात 36 टक्क्यांनी वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. एप्रिलअखेरीस, इक्विटीमधील एकूण गुंतवणूक 18.9 लाख कोटी रुपये होती.

गुंतवणुकीत पाचपट वाढ

उपलब्ध असलेल्या माहितीवरून असे दिसून आले की, गेल्या महिन्यात सेक्टरल (Sectoral) आणि थिमॅटिक (Thematic) फंडांमध्ये निव्वळ 3,843 कोटी रुपये, तर लार्ज आणि मिड कॅप स्कीम्समध्ये 2,050 कोटी रुपये आणि मिड कॅप फंडमध्ये 1,575 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. एकूण नऊ प्रकारच्या इक्विटी योजनांमध्ये 15,900 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली. जी एप्रिल, 2021 मध्ये 3,437 कोटी होती. यात सुमारे पाचपट वाढ झाल्याचे दिसून येते.

गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे 11,863 कोटी रुपये गुंतवले, जे मार्च महिन्यातील 12,378 कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित कमी होते. याबाबत मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक (व्यवस्थापक संशोधन) हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये बाजारांतील तीव्र चढ-उतार पाहिल्यानंतर, गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, ज्याचा ते फायदा करून घेत आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सेन्सेक्सने स्मार्ट रॅली पहिली. मार्चमधील 58,569 या अंकांवरून सेन्सेक्स 4 एप्रिल पर्यंत 60,612 पर्यंत वर गेला. त्यानंतर राजकीय तणाव आणि अमेरिकेतील दरांमध्ये मोठ्या प्रमामात वाढ झाल्याने शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आणि सेन्सेक्स 56,463 इतका खाली येऊन तो अखेर 57,061 वर बंद झाला.

ईटीएफ (ETF) आणि गोल्ड ईटीएफला (Gold ETF) पसंती

एप्रिलमध्ये इक्विटीशिवाय हायब्रीड फंडामध्ये 7,240 कोटी रुपये, आर्बिट्रेज फंडात जवळपास 4,100 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली. तसेच ईटीएफ (ETF) आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETF) फंडात चांगली गुंतवणूक झाल्याचे पाहावयास मिळाले. ईटीएफमध्ये मार्च महिन्यात 6,906 कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिलमध्ये 8,663 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर गोल्ड ईटीएफमध्ये मार्च महिन्यात 205 कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिलमध्ये 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यात फक्त इंडेक्स फंडमध्ये (Index Fund) घट झाल्याचे दिसून आले. जे मार्चमध्ये 12,313 कोटी होते, ते एप्रिल मध्ये 6,062 कोटी रूपयांवर आले.