RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येत्या काही दिवसात रेपो दरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयकडून हे पाऊल उचलले जाऊ शकते. मे महिन्यात आरबीआयने रेपो दर (RBI Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता. आताही आरबीआय पुन्हा एकदा 0.40 टक्क्यांनी रेपो दरात वाढ करून रेपो दर 4.80 टक्के करण्याची शक्यता आहे.
मे महिन्यातही महागाई 7 टक्क्यांवर असण्याची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयकडून रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 4 मे रोजी आरबीआयने अचानक रेपो दर वाढल्यानंतर, चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee-MPC) च्या अनेक सदस्यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी, जी गेल्या महिन्यात 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे; याबाबत पुढील बैठकीत रेपो दरात अधिक वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे एमपीसी (MPC) च्या पुढील 4 बैठकांमध्ये टप्प्याटप्प्याने आरबीआय बँक रेपो दर किमान 100 बेस पॉईंटनी वाढव्याची शक्यता आहे.
8 जून रोजी होणाऱ्या आरबीआयच्या धोरणात्मक बैठकीमध्ये 4.40 टक्के असलेल्या रेपो दरात 0.40 टक्के बेस पॉईंटची वाढ करून तो 4.80 टक्के होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा रेपो दर वाढ शकतात. यापूर्वी ही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले होते की, चलनवाढीचा दर 6 टक्क्यांवर आणण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.
ईएमआय (EMI), मुदत ठेवींचे (FD) काय होईल?
आरबीआय (Reserve Bank of India)ने रेपो दर वाढवल्यास बँका गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर कर्जांवरील व्याजदर वाढवतील. जर बँकांनी व्याजदर वाढवले तर मासिक ईएमआयच्या रकमेतही वाढ होईल.
दरम्यान, बचत खात्यात आणि मुदत ठेवी (एफडी) मध्ये पैसे ठेवणार्या गुंतवणूकदारांसाठी रेपो दर वाढल्यास फायद्याचे ठरू शकते. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास कर्ज महाग होईल पण त्याचवेळी बँका मुदत ठेवींवर (Fixed Deposit) जास्त व्याज देण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात आरबीआयने सादर केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात, वाढत्या महागाईच्या काळात शाश्वत आणि ठोस आर्थिक वाढीसाठी संरचनात्मक सुधारणांची गरज असल्याचे सांगत, बँकांना पुनर्रचित कर्जातील संभाव्य घसरणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले.