Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm: RBI ची पेटीएमवर मोठी कारवाई, अ‍ॅपवरून व्यवहार करता येणार का? जाणून घ्या

RBI

Image Source : https://www.flickr.com/photos/189675325@N04/52709512687 CC BY 2.0 DEED

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. पेटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्या.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँकेवर निर्बंध घालत डिपॉजिट अथवा क्रेडिट व्यवहार थांबवण्यास सांगितले आहे. तसेच, पेटीएम वॉलेट, फास्टॅग्स आणि NCMC कार्ड्समध्ये पैसे जमा करता येणार नाही. आरबीआयचा हा निर्णय 29 फेब्रुवारी 2024 नंतर लागू होणार असला तरीही  पेटीएमचा वापर करणाऱ्या यूजर्सच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरबीआयच्या या कारवाईचा पेटीएम यूजर्सवर नक्की काय परिणाम होईल, ते समजून घेऊयात.

RBI ने पेटीएमवर कारवाई का केली?

आरबीआयने बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. बँकेचे संपूर्ण ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरबीआयच्या निर्देशनास आले. त्यानंतरच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच पेटीएमने स्पष्ट केले की, समस्या दूर करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जात आहेत. ग्राहकांच्या खात्यामध्ये असलेल्या ठेवींवर याचा कोणताही परिणाम होणार आहे.

आरबीआयच्या कारवाईचा यूजर्सवर काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घेऊयात.

  • पेटीएम वॉलेट अथवा पेमेंट बँकेतून पैसे काढू अथवा वापरू शकता का?

तुम्ही पेटीएम वॉलेट अथवा पेमेंट बँकेतून कोणत्याही निर्बंधाशिवाय पैसे काढू शकता अथवा वापरू शकता. तसेच, 29 फेब्रुवारीपर्यंत पैसे खात्यात जमा देखील होतील. परंतु, त्यानंतर पेटीएम बँकेच्या खात्यातून केवळ पैसे काढता येतील, जमा करता अथवा इतरांकडून घेता येणार नाहीत.

  • पेटीएम वॉलेट अथवा पेमेंट बँकेत पैसे जमा करू शकता का?

ग्राहकांना 29 फेब्रुवारीनंतर खाते, वॉलेट्स, फास्टॅग, NCMC कार्ड्स, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्समध्ये पैसे जमा करता येणार नाही.

  • कॅशबॅक अथवा रिफंड मिळणार का?

तुमच्या पेटीएम वॉलेट अथवा पेमेंट बँकेत जमा रक्कमेवर तुम्हाला व्याज, कॅशबॅक आणि रिफंडचा फायदा मिळेल. तसेच, याचे पैसे देखील खात्यात जमा होतील.

  • पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून बँकिंग सेवेचा वापर करता येईल का?

आरबीआयच्या निर्देशानुसार 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून बँकिंग सेवेचा वापर करता येणार नाही. लक्षात घ्यायला हवे की, पेटीएम यूपीआय अ‍ॅप आणि पेटीएम पेमेंट्स बँक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आरबीआयने केवळ पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत.

तुमच्या यूपीआय अ‍ॅपमधील खाते पेटीएम पेमेंट्स बँकेशी लिंक असल्यास कोणताही व्यवहार करता येणार नाही. परंतु, इतर बँकेशी खाते लिंक असल्यास तुम्ही नियमितपणे याचा वापर करू शकता. Paytm QR, Paytm Soundbox, Paytm Card Machine सारख्या कंपनीच्या इतर सेवांवर देखील याचा कोणताही परिणाम होणार नाही.

  • बँकेमार्फत जारी केलेल्या फास्टॅग व एनसीएमसी ट्रान्सिट कार्ड्सचे काय होणार?

तुम्ही फास्टॅग व एनसीएमसी ट्रान्सिट कार्ड्समध्ये जोपर्यंत बॅलेन्स शिल्लक आहे, तोपर्यंत याचा वापर करू शकता. परंतु, 29 फेब्रुवारीनंतर यात पैसे जमा करता येणार नाही.

थोडक्यात, तुमचे खाते जर पेटीएम पेमेंट्स बँकेत असल्यास 29 फेब्रुवारी 2024 नंतर व्यवहार करताना अडथळे येऊ शकतात. मात्र, तुम्ही केवळ पेटीएम अ‍ॅपचा वापर करत असाल तर सहज व्यवहार करू शकता.