देशातली एक प्रमुख आयटी कंपनी कॉग्निझंटच्या (Cognizant) सीईओची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसचे (Infosys) माजी सीईओ रवी कुमार (Ravi Kumar) यांची कॉग्निझंटने नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. रवी हे कॉग्निझंटचे नवीन सीईओ आणि बोर्डाचे सदस्य म्हणून देखील काम बघणार आहेत. माजी सीईओ ब्रायन हम्फ्रीज (Brian Humphries) यांच्या जागेवर रवी यांची नेमणूक झाली आहे. तब्बल 20 वर्षे इन्फोसिसचे नेतृत्व केल्यानंतर रवी हे कॉग्निझंटसोबत काम करणार आहेत. यासाठी कंपनीने त्यांना भरघोस पगार देऊ केला आहे.
रवी कुमार कॉग्निझंटसाठी भरघोस पगारावर काम करतील
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रवी कुमार कॉग्निझंटमध्ये भरघोस पगारावर काम करणार आहेत. रवी कुमार यांना सुमारे 7 मिलियन डॉलर इतका वार्षिक पगार मिळेल. भारतीय चलनात त्यांचा पगार 56,96,77,500 रुपये इतका असणार आहे. यासोबत साइनिंग बोनस म्हणून सुमारे 7500,00 डॉलर मिळणार आहे. त्याच्याकडे तब्बल 56 कोटी रुपये पगाराचा पर्याय आहे. जर आपण सॅलरी ब्रेकअपवर नजर टाकली, तर कंपनी रवी कुमार यांना मूळ पगार म्हणून 1 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 8,13,57,500 रुपये देईल. याशिवाय, कंपनीकडून 2 मिलियन डॉलर पर्यंत प्रोत्साहनपर राशी (Incentive) मिळेल. यासोबत कंपनी त्यांना वन टाईम न्यू हायर (One Time New Hire) रकमेच्या स्वरूपात 5 मिलियन डॉलर इतकी रक्कम देणार आहे जी त्यांच्या कंपनीत सामील झाल्यानंतर एका वर्षाच्या आत स्टॉक रिटर्नवर आधारित असेल. याशिवाय पीएसयूच्या (PSU) रूपात त्यांना 3 मिलियन डॉलर मिळतील.
बाप रे! मुकेश अंबानीपेक्षा जास्त पगार!
रवी यांच्या आधी, कंपनीने 2020 मध्ये कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज (Brian Humphries) यांना सुमारे 13.8 मिलियन डॉलर इतका पगार दिला होता. रवी कुमार यांच्या पगाराची तुलना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पगाराशी केली तर ती जवळपास चौपट आहे. 2019-20 मध्ये मुकेश अंबानींचा पगार 15 कोटी होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यांनी एक रुपयाही पगार घेतला नाही. रवी कुमार यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. कॉग्निझंटचे इन-डिमांड सोल्यूशन्स, मजबूत ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यासाठी ते जबाबदार राहणार आहेत. इन्फोसिसमध्ये असताना रवी यांनी मोठे यश मिळवले आहे. रवी कुमार यांनी शिवाजी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले असून झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            