Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infosys Success Story : इन्फोसिसचं ऑफिस जेव्हा एका खोलीत भरत होतं…

Infosys

Infosys Success Story : इन्फोसिस कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. सात आयटी इंजिनिअर्सनी एका खोलीत एकत्र पाहिलेलं हे स्वप्न आज 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार गेलं आहे

कर्नाटकमधल्या विशी आणि तिशीत असलेल्या सात इंजिनिअरनी 1981 मध्ये एक उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्यातल्याच एका सहकाऱ्याच्या गॅरेजमध्ये त्यांनी आपली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली (Information Technology) कंपनी सुरू केली. कंपनीचं नाव होतं इन्फोसिस आणि हे सात अभियंते होते नारायण मूर्ती (Narayana Murthy), क्रिस गोपालकृष्णन, नंदन निलकेणी, एस डी शिबुलाल, के दिनेश, अशोक अरोरा आणि एन एस राघवन.

इतक्या छोट्या सुरुवातीपासून मध्यमवर्गीय तरुणांनी इन्फोसिसला 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या उलाढालीपर्यंत पोहोचवलं म्हणून इन्फोसिसचं उदाहरण उद्योजकतेसाठी कायम घेतलं जातं. इन्फोसिसबद्दल अशा अनेक आठवणी आहेत ज्यांची पुन्हा उजळणी होतेय ती मनीकंट्रोल डॉट कॉम या वेबसाईटने इन्फोसिसच्या सर्व संस्थापकांच्या घेतलेल्या मुलाखतींमुळे.

यातलेच एक संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी एका खोलीत भरणाऱ्या ऑफिसविषयी अनेक आठवणी सांगितल्या. गॅरेजमध्ये भरणारं ऑफिस पुढच्या काही वर्षांनी इमारतीतल्या छोट्या फ्लॅटमध्ये गेलं. पण, इथंही केबिन एकच होती. त्याविषयी गोपालकृष्णन सांगतात, ‘आम्ही सातही जण जागा मिळेल तशी एकाच खोलीत बसायचो. केबिन एवढ्याच साठी होती की, कुणाला काही महत्त्वाचं काम आलं किंवा महत्त्वाची मिटिंग करायची असेल तर त्याने ती वापरावी. पण, त्या दिवसांमध्ये आमच्यामधले बंध दृढ झाले. अगदी वैयक्तिक आयुष्यातही आम्ही एकमेकांसाठी उभे राहायला लागलो.’

विशेष म्हणजे 1981 मध्ये स्थापना झाल्यापासून पुढची दहा वर्षं इन्फोसिसचं ऑफिस असंच छोट्या खोलीत भरत होतं. आणि महिन्याचे पगार देता आले तरी संस्थापकांना मोठा आधार वाटायचा.

सुरुवातीच्या कठीण दिवसांबद्दल बोलताना गोपालकृष्णन असंही म्हणाले की, ‘काही वेळा आम्ही आमच्या ग्राहकांकडून पैसे आगाऊ मागून घ्यायचो. त्यातून कंपनीचा काही खर्च भागायचा. असं करून कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही चुकवले.’

कंपनीच्या सुरुवातीच्या अनुभवामुळे सातही संस्थापक आणि त्यांचे कुटुंबीय एकमेकांचे चांगले मित्र झाले ही गोष्ट त्यांनी आवर्जून नमूद केली.

‘आमच्या आयुष्य तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने सुरू होतं. आम्ही एक छोटं ऑफिस एकमेकांमध्ये वाटून घेतलं. ऑफिस प्रमाणेच एकमेकांची घरही कधी कधी वाटून घेतली. एकत्र जेवण बनवलं. सगळं काही एकत्र केलं. आमच्या कुटुंबीयांनी साथ दिली. कारण, सगळ्यांचं उद्दिष्टं एकच होतं. इन्फोसिसच्या विकासाच!’

इन्फोसिसमध्ये या घडीला 3,45,000 च्या वर कर्मचारी वर्ग आहे. आणि जगभरात कंपनीच्या अमेरिका आणि युरोपमध्येही शाखा आहेत. इन्फोसिसचं बंगळुरूमध्ये असलेलं मुख्यालय 81 एकरांमध्ये वसलेलं आहे. अलीकडेच कंपनीने 100 अब्ज अमेरिकन डॉलरचं बाजार भांडवल उभं केलं आहे. आणि नासडॅक या अमेरिकन बाजारात नोंदणी झालेली ही भारतातली पहिली माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.