Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infosys Culture : Narayana Murthy सकाळी 6.20 वाजता ऑफिसला यायचे कारण…   

Narayana Murthy

Infosys Culture : इन्फोसिस या देशाच्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचं साम्राज्य कसं उभं केलं याची काही गुपितं संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली आहेत. आणि ही गुपितं उद्योजकतेचा वस्तूपाठ घालून देणारी आहेत

असं म्हणतात, ‘वेळ कुणासाठी थांबत नाही.’ इन्फोसिस (Infosys) या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मेड इन इंडिया (Made in India) कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा या उक्तीवर पहिल्यापासून विश्वास होता. मनीकंट्रोल डॉट कॉम (moneycontrol.com) या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती म्हणतात, ‘कंपनीत कामाची संस्कृती तयार करणं हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी मी रोज सकाळी 6.20 मिनिटांनी इन्फोसिसच्या कार्यालयात पोहोचायचो. अगदी 2011 मध्ये मी निवृत्त होईपर्यंत हा शिरस्ता सोडला नाही.’    

हे सांगतानाही मूर्ती यांच्यातला ठामपणाच दिसत होता. कारण, मुलाखतकार मूर्ती यांची ओळख करून देताना म्हणत होता, ‘ते सात वाजता कार्यालयात पोहोचायचे.’ मुलाखतकाराला अर्धवट तोडत मूर्ती म्हणाले, ‘सात नाही, सहा वाजून 20 मिनिटं.’ 76 वर्षीय माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि अब्जाधीश उद्योजक आपल्या या सवयीला इन्फोसिसच्या यशाचं गमक मानतात .    

‘आम्ही नवीन कंपनी स्थापन केली होती. अवती भवती सगळे नवीन काहीतरी करू पाहणारे तरुण होते. त्यांच्यासमोर मी वक्तशीरपणाचं उदाहरणच घालून दिलं. तेच मला करायचं होतं. फक्त कार्यालयात जाणं-येणंच नाही तर सगळी कामं वेळेत व्हावीत हा संदेश त्या मागे होता,’ मूर्ती यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं.    

उद्योजकता म्हणजे काय हे ही त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितलं, ‘उद्योजकता म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि हिंमत, उद्योजकता म्हणजे काही गोष्टींचा त्याग आणि त्यानंतर मिळणाऱ्या गोष्टीचा आनंद,’ असं नारायण मूर्ती म्हणाले. जेव्हा अस्तित्वात नसलेली गोष्ट तुम्ही उभी करता तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत आणि त्यातून आनंद मिळवता आला पाहिजे, असंच त्यांना म्हणायचं होतं.    

‘सुरुवातीला छोटं छोटं यश मिळतं. त्यातच माणूस आनंद मानत असतो. पण, या आनंदातून आणखी मोठं काही करण्याची प्रेरणा मिळाली, तर उद्योग आणि तुम्हीही वाढत जाता,’असं एका प्रश्नाच्या उत्तरात नारायण मूर्ती म्हणाले.   

‘सकाळी सहाला घर सोडलं तरी रात्री 9 वाजेपर्यंत इन्फोसिसमध्येच असायचो. त्यामुळे पत्नी सुधा मूर्ती आणि मुलं अक्षता आणि रोहन यांना याचा फटका बसला. पण, त्यांनी सांभाळून घेतलं अशी कृतज्ञताही मूर्ती यांनी व्यक्त केली. ’   

इन्फोसिस ही नासडॅक या अमेरिकेतल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झालेली भारतीय कंपनी आहे. आणि गेल्याच वर्षी कंपनीने आपलं बाजार भांडवल 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेलं आहे. हा पल्ला गाठणारी ही चौथी भारतीय कंपनी ठरलीय.