गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी पुढील 15 दिवस महत्वाचे आहेत. कारण सप्टेंबर 2023 या महिन्यातील रेल्वे प्रवासाची आगाऊ तिकिट बुकिंग प्रक्रिया IRCTCच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी असून त्यासाठीची आगाऊ तिकिट बुकिंग पुढील आठवडाभरात सुरु होणार आहे.
मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता रिझर्व्हेशन्स खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिट बुकिंग फुल्ल होते. कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी या गाड्यांची बुकिंग काही मिनिटांतच फुल्ल होते. वेटिंगवर राहण्याऐवजी कन्फर्म तिकिटासाठी कोकणवासीयांना कोकणातील गाड्यांच्या रिझर्व्हेशन्सवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेश अर्थात IRCTC च्या वेबसाईटवर 120 दिवस आधी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिटांच आगाऊ बुकिंग सुरु होतात. या गाड्यांमध्ये जनरल श्रेणी वगळता स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट एसी, एसी चेअर कार अशा श्रेणीसाठी तिकिटांची आगाऊ बुकिंग करता येते. प्रवासाच्या दिवसापासून 120 दिवस आधी अॅडव्हान्स तिकिट बुकिंगची सुविधा ऑनलाईन आणि तिकिट खिडकीवर सुरु होणार आहे. आज 5 मे रोजी 2 सप्टेंबर 2023 या दिवसाचे आगाऊ तिकिट बुकिंग सुरु झाले आहे.
यंदा गणेशोत्सवासाठी 16 मे 2023 पासून ( प्रवासाची तारिख बुधवार, 13 सप्टेंबर 2023) आगाऊ तिकिट बुकिंग सुरु होणार आहे. irctc.co.in या वेबसाईटवर ऑनलाईन रिझर्व्हेशन करता येऊ शकते. त्याशिवाय 17 मे 2023 रोजी 14 सप्टेंबर 2023 चे बुकिंग खुले होणार आहे. अशाच प्रकारे 18 मे 2023 रोजी प्रवाशांना 15 सप्टेंबर 2023 ची तिकिटे बुक करता येतील. 19 मे रोजी 16 सप्टेंबर आणि 20 मे रोजी 17 सप्टेंबर 2023 या दिवसांचे रिझर्व्हेशन खुले होणार आहेत. सकाळी आठ वाजता तिकिट खिडकीवर आरक्षण सुरु होते.
येत्या 18 सप्टेंबरसाठीची तिकिटे 21 मे 2023 रोजी आगाऊ बुकिंगासाठी खुली होतील. 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका तृतीया आहे. 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी जाण्यासाठी 22 मे 2023 रोजी तिकिटाचे बुकिंग खुले होणार आहे. अशाच प्रकार परतीच्या प्रवासासाठी 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरी गणपती विसर्जन असून या दिवसाची आगाऊ तिकिट बुकिंग 26 मे 2023 रोजी करता येईल. त्याशिवाय 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवसाचे रिझर्व्हेशन बुधवारी 31 मे 2023 रोजी खुले होणार आहे.
कन्फर्म तिकिटांसाठी 'या' गोष्टी करा
- कोकणात जाण्यासाठी मुंबईतून दररोज सात ते आठ ट्रेन्स जातात. त्यांची माहिती घ्या.
- यातील किमान दोन ते तीन गाड्यांची निवड करा.
- गणेशोत्सवाच्या अगदी दोन दिवसआधीच जाणार असाल तर प्रवाशांची गर्दी प्रचंड असेल हे लक्षात घेता प्रत्यक्ष तिकिट खिडकीवरुन तिकिटांचे बुकिंग करणे सोपे जाईल.
- ऑनलाईन बुकिंग करणार असाल तर फास्ट इंटरनेट स्पीड आवश्यक आहे अन्यथा एकाचवेळी हजारो युजर्स आल्याने IRCTCची साईट स्लो होण्याची शक्यता आहे.
- ऑनलाईन तिकिट बुकिंग करताना पेमेंट कसे करणार आहात हे आधीच ठरवून ठेवा.
- irctc च्या अधिकृत मोबाईल अॅपवर देखील जलदगतीने तिकिट बुक करण्याचा पर्याय आहे.
- अनेकदा साईट स्लो झाल्याने पेमेंट प्रोसेस पूर्ण होत नाही. त्यामुळे क्यूआर कोड किंवा कार्ड पेमेंट करताना इंटरनेट स्पीडचा अंदाज घ्या.
- गणेश चतुर्थीच्या आठवडाभर आधीची ट्रेन्सची कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकतात शिवाय तुलनेने गर्दी कमी असेल.
- IRCTC ऑनलाईन तिकिट बुकिंगवेळी इन्शुरन्सचा पर्याय दिला जातो. त्याचा अवश्य फायदा घ्या. अगदी अत्यल्प किंमतीत हा विमा मिळतो.
विकल्पचा पर्याय देईल तुम्हाला कन्फर्म तिकीट
भारतीय रेल्वेने आणलेल्या विकल्प योजने अंतर्गत प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. प्रवाशी ज्यावेळी तिकीट बुक करतात. त्यावेळी त्यांना हव्या असलेल्या ट्रेनचे कन्फर्म तिकिट उपलब्ध नसेल तर ते कन्फर्म तिकिटासाठी दुसऱ्या ट्रेनची निवड करू शकतात. त्यासाठी त्यांना विकल्प हा पर्याय दिला जात आहे. ही योजना अल्टरनेट ट्रेन अॅकोमोडेशन स्कीम (ATAS) या नावाने देखील ओळखले जाते. या योजने अंतर्गत जर तुम्ही तिकिट बुक करत असलेल्या ट्रेनमध्ये कन्फर्म सीट उपलब्ध नसेल आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये सीट उपलब्ध असेल तर कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रवाशांना मदत होणार आहे. मुख्य ट्रेनच्या निघण्याच्या वेळेपासून 30 मिनिटे ते 72 तासाच्या दरम्यान सुटणाऱ्या ट्रेनची प्रवाशी निवड करू शकतात. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. फक्त भाड्यामधील फरकाची रक्कम प्रवाशांकडून घेतली जाणार आहे.