भारतातील बहुसंख्य लोक मोठ्या प्रमाणावर रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून रास्त दरात तिकिटे आणि सर्वोत्तम सेवा पुरवण्यात येत असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणावर रेल्वेला पसंती देत आहेत. पण रेल्वेने प्रवास करताना बऱ्याच वेळा प्रवाशांना कन्फर्म तिकीट उपलब्ध होत नाही. अडचणीच्या परिस्थितीत प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून विकल्प योजना घोषित करण्यात आली. या योजने अंतर्गत प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. IRCTC ची विकल्प योजना नक्की काय आहे आणि त्यासाठी प्रवाशांना काय करावे लागेल, हे जाणून घेऊ.
काय आहे IRCTC ची विकल्प योजना
भारतीय रेल्वेने आणलेल्या विकल्प योजने अंतर्गत प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. प्रवाशी ज्यावेळी तिकीट बुक करतात. त्यावेळी त्यांना हव्या असलेल्या ट्रेनचे कन्फर्म तिकिट उपलब्ध नसेल तर ते कन्फर्म तिकिटासाठी दुसऱ्या ट्रेनची निवड करू शकतात. त्यासाठी त्यांना विकल्प हा पर्याय दिला जात आहे. ही योजना अल्टरनेट ट्रेन अॅकोमोडेशन स्कीम (ATAS) या नावाने देखील ओळखले जाते.
या योजने अंतर्गत जर तुम्ही तिकिट बुक करत असलेल्या ट्रेनमध्ये कन्फर्म सीट उपलब्ध नसेल आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये सीट उपलब्ध असेल तर कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रवाशांना मदत होणार आहे. मुख्य ट्रेनच्या निघण्याच्या वेळेपासून 30 मिनिटे ते 72 तासाच्या दरम्यान सुटणाऱ्या ट्रेनची प्रवाशी निवड करू शकतात. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. फक्त भाड्यामधील फरकाची रक्कम प्रवाशांकडून घेतली जाणार आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की, ATAS च्या माध्यमातून प्रवाशांना दरवेळी कन्फर्म तिकीट मिळेलच याची शाश्वती आयआरसीटीसी देत नाही.
विकल्प पर्यायाची निवड कशी करावी?
- प्रवाशांना जर IRCTC च्या विकल्प पर्यायाची निवड करायची असेल, तर त्यांना रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून तिकीट बुक करतानाच Vikalp हा पर्याय निवडावा लागेल.
- प्रवासी ज्या ट्रेनचे तिकीट बुक करत आहे. त्या ट्रेनमध्ये जर तिकीट उपलब्ध नसेल आणि त्यांना वेटिंग तिकीट उपलब्ध करून देण्यात येत असेल, तर प्रवासी Vikalp या पर्यायाची निवड करू शकतात.
- तिकीट बुक करताना प्रवाशांना Vikalp या पर्यायाची निवड करावी लागेल. हा पर्याय निवडल्यानंतर प्रवाशाला वेगवेगळ्या ट्रेनचे पर्याय उपलब्ध होतात.
- प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना Vikalp हा पर्याय उपलब्ध होत नसेल, तर बुक केलेल्या तिकीट history मधून हा पर्याय पाहता येईल.
- प्रवासी या पर्यायाद्वारे एकूण 7 ट्रेनची निवड करू शकतात. त्याहून जास्त ट्रेनची निवड करता येणार नाही.
- विकल्प पर्यायामधून रेल्वे तुमच्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनमधून कन्फर्म तिकिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करते. या पर्यायामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होते.