PMC WhatsApp ChatBot Services: आधुनिक तंत्रज्ञानामुळे हल्ली वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळवता येते. व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) सध्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या प्रभावी माध्यमाचा वापर करत अनेक संस्था, कार्यालये आपली माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहेत. अलीकडच्याच काही वर्षांमध्ये आपल्याला बँकेची सेवा व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) उपलब्ध झाल्याचे पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे. आपल्याला छोट्या कामांसाठी बऱ्याच वेळा पालिकेत फेऱ्या माराव्या लागतात, मात्र पुणे महानगरपालिकेने(PMC) नागरिकांचा हा त्रास दूर केला आहे. घरबसल्या पुण्यातील लोकांना व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. चला तर पुणे महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत जाणून घेऊयात.
पालिकेच्या 19 विभागातील 80 सेवांचा लाभ व्हॉट्सअॅपवर
पुणे महानगरपालिकेने(PMC) सुरु केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट(WhatsApp) या सेवेमध्ये नागरिकांना पालिकेतील 19 विभागातील 80 सेवांचा लाभ घेता येणार आहेत. या प्रकारची व्हॉट्सअॅपच्या(WhatsApp) माध्यमातून नागरिकांना सेवा देणारी पुणे(Pune) ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत भारतात महानगरपालिकेने ऑनलाईन(Online) सेवा सुरु केल्या आहेत. परंतु व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) कोणत्याही महानगरपालिकेने सेवा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात अनेक शहरातील महानगरपालिका व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) सेवा उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतील.
घरबसल्या या सेवांचा घेता येईल लाभ
या सेवांमध्ये नागरी सेवा सुविधा, विभिन्न विभागांनी बिले भरणे, परवाना काढणे किंवा परवानगी घेणे, विविध दाखले, ना हरकत प्रमाणपत्र अशी अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे. या सेवेच्या माध्यमातून विविध प्रकारची मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलक याची बिलं सुद्धा भरता येणार आहेत. याशिवाय कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना, नवीन नळजोडणी अर्ज इ. परवाने मिळू शकणार आहेत. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसाहक्क हस्तांतरण या कागदपत्रांसाठी आता पालिकेच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही. या सर्व सेवा नागरिकांना व्हॉट्सअॅप(WhatsApp) चॅटबॉटच्या माध्यमातून 24 तास उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पालिकेच्या 8888251001 या व्हॉट्सअॅप(WhatsApp) नंबरशी संपर्क साधावा लागणार आहे. या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याची सोय आणि तक्रारीची सद्यस्थिती पाहण्याची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विविध योजनांची घरबसल्या मिळतीये माहिती
पालिकेकडून(PMC) राबवण्यात येणाऱ्या शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना,पंतप्रधान आवास योजना, प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना, महिला सक्षमीकरण योजना, युवक कल्याणकारी योजनांचीही माहिती व्हॉट्सअॅपच्या(WhatsApp) माध्यमातून पुरवली जात आहे.