केंद्रसरकारने 16 डिसेंबरपासून देशांर्तगत उत्पादन होणारं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू (Crude Oil & Natural Gas) यांच्यावरील विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर 16 डिसेंबरपासूनच लागू झाला आहे. इथून पुढे प्रती टन 1700 रुपये इतका विंडफॉल टॅक्स देशातल्या तेल कंपन्यांना भरावा लागेल. पूर्वी हाच दर प्रती टन 4,900 रुपये इतका होता.
दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम मंत्रालय विंडफॉल कराचा फेरआढावा घेत असतं. ताज्या दररचनेनुसार, देशातून बाहेर निर्यात होणाऱ्या पेट्रोलवर प्रती लीटर 8 रुपये तर डिझेलवर प्रतीटन 5 रुपये इतका विंडफॉल टॅक्स लागणार आहे. याव्यतिरिक्त प्रती लीटर 1.5 रुपये अधिभारही तेल कंपन्यांना लागणार आहे.
तर विमानांसाठी लागणाऱ्या टर्ब्युनल इंधनासाठी इथून पुढे 1.5 रुपये प्रती लीटर इतका विंडफॉल कर द्यावा लागेल. हे प्रमाण पूर्वी लीटरमागे 5 रुपये इतकं होतं.
हे नवीन दर पेट्रोलियम मंत्रालयाने नवीन पत्रक काढून प्रसिद्ध केले आहेत. जुलै 2022 मध्ये केंद्रसरकारने तेल कंपन्यांवर विंडफॉल कर लागू केल्या. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) यासारख्या सरकारी कंपन्यांबरोबरच खाजगी तेल कंपन्यांवरही हा कर सारख्याच प्रमाणात लावला जातो. कर वसूल करायला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर चढे आहेत. त्यामुळे प्रत्येक पंढरवड्यानंतर होणाऱ्या फेरआढाव्यात हा कर कमीच होत आला आहे. आणि सध्या तो मूळ कराच्या 65% वर स्थिरावला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील का? Will Petrol-Diesel Prices fall?
विंडफॉल कर म्हणजे नेमकं काय हे तुम्ही या लिंकमध्ये वाचू शकाल. तेल कंपन्या भरमसाठ नफा कमावतात. त्यामुळे एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त नफा त्यांनी कमावला तर त्यातला काही हिस्सा या कराच्या रुपाने सरकार काढून घेते. जगभरात अमेरिका, युके आणि युरोपातले इतरही देश हा कर तेल कंपन्यांकडून वसूल करतात.
पण तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का? तर नक्कीच. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढत असतात, तेव्हा तेल कंपन्यांचाही तेल विक्रीतून होणारा नफा वाढतो. आणि हे प्रमाण वाढल्यावर त्यांना विंडफॉल कर भरावा लागतो. आता तोच कमी झाल्यामुळे कंपन्या त्यांना मिळालेली सवलत ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात.
16 डिसेंबरला देशात महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर काय होते ते बघूया..
[दर प्रतीलिटर, रुपयांमध्ये]
मुंबई - पेट्रोल (106.31), डिझेल (94.27)
नवी दिल्ली - पेट्रोल (96.72), डिझेल (89.62)
बंगळुरू - पेट्रोल (101.94), डिझेल (87.89)
कोलकाता - पेट्रोल (106.03), डिझेल (92.76)
चेन्नई - पेट्रोल (102.63), डिझेल - (94.24)