जगभरातील देशांचा महागाई दर आणि तेथील राहणीमान लक्षात घेता नुम्बेओ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स (Numbeos cost of living index) नुसार देश 2023 नुसार, पाकिस्तान हा राहण्यासाठी सर्वात स्वस्त देश ठरला आहे. या अहवालानुसार पाकिस्तान जगातील सर्वात कमी खर्चिक देश ठरला आहे.
घरभाडे, किराणा मालाच्या किंमती, हॉटेल खर्च आदी मुद्दे लक्षात घेऊन ही यादी प्रकाशित केली गेली आहे.पाकिस्तान हा देश सध्या आर्थिक संकटातून जातो आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तान हा स्वस्त देश ठरला आहे.
नुम्बेओच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार, 18 गुणांसह पाकिस्तान स्वस्त देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.पाकिस्तानातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत पेशावर पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल मुलतान, फैसलाबाद, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि कराची या शहरांचा समावेश आहे.
Pakistan is the least expensive country in the world to live in, according to Numbeo’s Cost of Living Index by Country 2023, despite being listed bottom on the list. pic.twitter.com/ZOVrNkRBGP
— Economy.pk (@pk_economy) March 28, 2023
जगातील सर्वात स्वस्त देशांच्या यादीत पाकिस्तान खालोखाल इजिप्त, भारत, कोलंबिया, लिबिया, नेपाळ, श्रीलंका, युक्रेन, किर्गिझस्तान आणि सिरीया या देशांचा क्रमांक आहे.
स्वस्त देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!
कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार, 22.4 गुणांसह भारत स्वस्त देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतात राहण्याचा खर्च 69.6% कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच घरभाडे देखील अमेरिकेच्या तुलनेत 88.5% स्वस्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भारतातील सर्वात स्वस्त शहरात भोपाळ हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तिरुवनंतपुरम, तिसऱ्या क्रमांकावर कोईम्बतूर, चौथ्या क्रमांकावर कोची तर पाचव्या क्रमांकावर जयपूर हे शहर आहे.
पुणे शहर 15 व्या क्रमांकावर असून, दिल्ली 17 तर नवी मुंबई 19 व्या स्थानावर आहे. बंगलोर हे शहर 20 व्या स्थानी असून मुंबई मात्र 21 व्या स्थानावर आहे. या अहवालात जगभरातील देशांच्या मोजक्या शहरांचा आढावा घेण्यात आला आहे.
जगभरातील महाग देश!
नुम्बेओ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023 नुसार बर्म्युडा हा देश सर्वात महागडा देश म्हणून गणला गेला आहे. येथे राहण्यासाठी, फिरण्यासाठी आणि खाद्यान्नासाठी अमेरिकेच्या आणि बाकी पाश्चात्य देशांच्या तुलनेत अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. बर्म्युडा खालोखाल स्वित्झर्लंड हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.