Ring road update: रिंग रोड हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने(MSRDC) हाती घेतलेल्या रिंग रोडच्या भूसंपादनामध्ये मावळ(Maval) आणि मुळशी(Mulashi) या तालुक्यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी मावळ आणि मुळशी तालुक्यांतील भूसंपादनासाठी 21 गावांमध्ये पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल. त्या शिबिरामध्येच संपादित करण्यात येणाऱ्या जागेच्या मालकांचे संमतीपत्रक आणि मोबदल्याचा धनादेश देण्याचे काम एकाच वेळी करण्यात येईल. चला याबद्दल जाणून घेऊयात.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा आदेश
रिंग रोड हा मावळ आणि मुळशी तालुक्यांतील 21 गावांमधून जात आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येणार आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचे मोबदल्याचे मूल्यांकन करताना मालकांना विश्वासात आणि त्यांची संमती घेऊन निश्चत करण्यात येणार असल्याचे MSRDC ने सांगितले आहे . मूल्यांकन करताना मोकळ्या जमिनी, झाडे, घरे, इ असे मूल्यांकन करून मोबदला निश्चित केला आहे व त्यास जागा मालकांनी संमतीही दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख(Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.
असा आहे रिंग रोड प्रकल्प
पुणे(Pune) आणि पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पूर्व भागात मावळ-11, खेड-12, हवेली-15 , पुरंदर-5 आणि भोरमधील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर पश्चिम भागात भोर-5, हवेली-11, मुळशी-15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. रिंगरोडचा पश्चिम प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागले आहे. एमएसआरडीसी रिंगरोडसाठी मुळशी आणि मावळ तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात दोन गावांत तीन दिवस शिबीराचे आयोजन करणार आहे. या शिबिरामध्ये जागा मालकांचे संमतीपत्रक घेऊन त्यांना जागेच्या मोबदल्यात धनादेश दिला जाईल.