शेअर मार्केटवर सध्या घसरणीचा दबाव असला तरी बुधवारी 1 फेब्रुवारी 2023 रोजी मार्केटचा कसा मूड असेल याबाबत गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे. बजेट आणि मार्केट रिअॅक्शनचा विचार केला तर मागील 10 वर्षात केवळ दोन वेळा शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली आहे.
गेल्या महिनाभरात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2.9% घसरण झाली. तीन महिन्यांचा विचार केला तर निफ्टी सरासरी 0.7% घसरण झाली आहे. वर्ष 2020 मध्ये शेअर मार्केटमध्ये अनुक्रमे 5.1% आणि 1.9% घसरण झाली होती. गेल्या 10 बजेटपैकी दोन वेळा शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे शेअर गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचे लक्ष आता बजेटकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटमध्ये काय काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान
हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी सूमहाच्या शेअर्समध्ये मागील दोन सत्रात प्रचंड घसरण झाली आहे. अदानी ग्रुपमध्ये झालेल्या पडझडीने तब्बल 4 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. हिंडनबर्गचा अहवाल जाहीर झाल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांनी भारतीय बाजारांतून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. शेअर बाजारांच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 9350 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचे बजेटकडे लक्ष
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या मागील चार बजेटनंतर शेअर बाजाराने सकारात्मक परतावा दिला आहे. वर्ष 2021 मध्ये बजेटनंतर निफ्टीने 2.5% परतावा दिला आहे. बुधवारी 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकार बजेट सादर करेल. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने केंद्र सरकारसाठी जास्तीत जास्त घटकांना सवलती देण्यासाठी पूर्ण बजेटच्या निमित्ताने संधी आहे. त्यामुळे शेअर गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचे लक्ष आता बजेटकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटमध्ये काय काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
कोव्हीड संकटानंतर सरकारच्या खर्चात वाढ झाली होती. त्यामुळे वित्तीय तूट प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. चालू वर्षात वित्तीय तूट 6.4% इतकी राहण्याची शक्यता आहे. मात्र 2025-26 पर्यंत वित्तीय तूट 4.5% इतकी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.