शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. मात्र त्यापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांची घसरण झाली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र सुरु झाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या बजेटकडे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आज स्त्री शक्तीचा सन्मान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 250 अंकानी वधारला होता. मात्र त्यानंतर त्यात नफावसुली दिसीन आली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 15 शेअर तेजीत असून 15 शेअरमध्ये घसरण झाली आहे. बँकां, वित्त संस्था, आयटी सेवा कंपन्यांमध्ये घसरण झाली. एचडीएफसी बँक, इंड्सइंड बँक, एचडीएफसी, कोटक बँक, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, एलअँडटी या शेअरमध्ये घसरण झाली.
आजच्या सत्रात मेटल उद्योगाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक, नाल्को, मिश्र धातू निगम, जेएसडब्लू, टाटा स्टील या शेअरमध्ये तेजी आहे. दुपारी 12 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 33 अंकांच्या घसरणी 59466 अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17641 अंकांवर ट्रेड करत आहे.
आजच्या सत्रात अदानी समूहातील शेअरमध्ये घसरण सुरुच आहे. आजच्या सत्रात अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी विल्मर या शेअरमध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्राईस आणि अदानी पोर्ट हे दोन शेअर काही प्रमाणात सावरले.