Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Scams: यूपीआयच्या माध्यमातून होतेय मोठी आर्थिक फसवणूक, जाणून घ्या स्कॅम्सचे प्रकार व सुरक्षेचे उपाय

UPI Scams

Image Source : https://www.freepik.com/

भारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.

यूपीआयने भारतात डिजिटल आर्थिक क्रांती घडवली आहे. गेल्याकाही वर्षात यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र, यासोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांनी कष्टाने कमवलेले पैसे लुटत आहेl. यूपीआयच्या माध्यमातून होणारे हे घोटाळे थांबविण्यासाठी व नागरिकांना याबाबत सतर्क करण्यासाठी एनपीसीआयद्वारे (National Payments Corporation of India) वेगवेगळ्या मोहीम राबविल्या जात आहेत.

अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ (Gyaan Se, Dhyaan Se) मोहीम चालवली जात आहे. ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम नक्की काय आहे व घोटाळ्यांपासून कसे सावध राहू शकता, याविषयी जाणून घेऊया. 

एनपीसीआयची ऑनलाइन व्यवहारांसाठी नवीन सुरक्षा मोहीम

एनपीसीआयद्वारे यूपीआय प्रणाली विकसित करण्यात आली असून, याद्वारेच रिटेल पेमेंट्स व सेटेलमेंट सिस्टम्सवर देखरेख ठेवली जाते.  एनपीसीआयकडून आता नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ‘ज्ञान से ध्यान से’ राबविली जात आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या स्कॅम्सची माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून, नागरिकांचे नुकसान होणार नाही.

एनपीसीआयने अभिनेता पंकज त्रिपाठी यांची ‘यूपीआय सुरक्षा राजदूत’ म्हणून देखील नेमणूक केली आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या व्हीडिओच्या माध्यमातून गुंतवणूक, बनावट बिले सारख्या स्कॅम्स माहिती दिली जात आहे. 

ऑनलाइन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार

गुंतवणूक स्कॅम आकर्षक परताव्याच्या नावाखाली आपण  कोणाचेही ऐकूण कशातही गुंतवणूक करतो. सायबर गुन्हेगार 15 दिवसात, एका महिन्यात गुंतवणुकीच्या दुप्पट-तिप्पट रक्कम मिळेल, असे सांगून पैशांचे आमिष दाखवतात. मात्र, अशा बनावट योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे योजना कितीही आकर्षक असली तरीही खात्री न करता थेट रक्कम  गुंतविण्याची अथवा यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठविण्याची चूक करू नये.  
बनावट बिल स्कॅमथकबाकीच्या नावाखाली सर्रासपणे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळते. प्रामुख्याने वेगवेगळ्या बिलांचे पेमेंट बाकी असल्याचे सांगून पैसे उकळले जातात. सायबर गुन्हेगार क्रेडिट कार्ड, वीज बिल अशा विविध बिलांचे पैसे भरण्याचे बाकी असल्याचे सांगतात. तसेच, बिल न भरल्यास सेवा बंद केली जाईल असे सांगून घाबरवतात. यासाठी यूजर्सच्या यूपीआय अकाउंटवर पैसे भरण्यासाठी लिंक देखील पाठवली जाते. अनेकदा यूजर्स अशा फसवणुकीला बळी पडतात व घाबरून पैसे पाठवतात.  
फिशिंग स्कॅम स्कॅमर्स फसवणुकीसाठी अनेक वेगवेगळे मार्ग अवलंबवितात. फिशिंग स्कॅम हा त्यातीलच एक प्रकार आहे. यामध्ये यूजर्सला एसएमएसच्या माध्यमातून बनावट वेबसाइटची लिंक पाठवली जाते. ही लिंक हुबेहब लोकप्रिय बँक अथवा संस्थेच्या वेबसाइटसारखीच असते. यूजर्सने अशा लिंक्सवर क्लिक करताच आपोआप बँक खात्यात पैसे वजा होतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेज अथवा ईमेलवर विश्वास ठेऊ नये.
बनावट अ‍ॅप्स माध्यमातून फसवणूक स्कॅमर्स यूजर्सला फोन करून वेगवेगळे अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास सांगतात. प्रामुख्याने AnyDesk, TeamViewer सारखे रिमोट अ‍ॅक्सेस देणारे अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुमच्या डिव्हाइसचा पूर्ण कंट्रोल स्कॅमर्सकडे जातो. यामुळे स्कॅमर्स तुमची खासगी माहिती चोरून फसवणूक करू शकतात. तसेच, फोनमध्ये बनावट अ‍ॅप्स असल्यास त्या माध्यमातून देखील फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे यूपीआय पिन, पासपर्ड व ओटीपीची माहिती शेअर करू नये.
कस्टमर सपोर्ट स्कॅम स्कॅमर्स बँक अथवा लोकप्रिय संस्थेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून नागरिकांना लुटत असल्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. यूजर्सकडून कस्टमर सपोर्टच्या नावाखाली यूपीआय अ‍ॅप्सची माहिती मागितली जाते. तसेच, रिमोट अ‍ॅक्सेस देणारे अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते व या माध्यमातून पैसे चोरी केले जातात.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

कोणत्याही ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नये. बँक खाते नंबर, यूपीआय पिन, अ‍ॅप्स पासवर्ड, ओटीपी अशी माहिती कोणाशीही शेअर करू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. तसेच, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्याही मेसेज अथवा लिंकबाबत शंका असल्यास तुम्ही बँकेशी संपर्क करू शकता.