Nirma -GLS Deal: कपडे धुण्याची निरमा डिटर्जंट पावडर तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ही कंपनी सिमेंट, फार्मासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये काम करते हे अनेकांना माहिती नसेल. निरमा ग्रुप आता ग्लेनमार्क लाइफ सायन्स ही कंपनी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे.
ग्लेनमार्क ग्रूप आर्थिक अडचणीत
ग्लेनमार्क फार्मा आर्थिक अडचणीत सापडली असून ग्लेनमार्क लाइफ सायन्स (GLS) या सहयोगी कंपनीतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे. अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडियंट निर्मिती करणारी GLS ही मोठी कंपनी आहे. ग्लेनमार्क फार्मावर सुमारे 2 हजार 900 कोटींचे कर्ज असून ते फेडण्यासाठी एक कंपनी विकण्याची वेळ आली आहे.
GLS शेअर 70 टक्क्यांनी वधारला
दरम्यान, निरमा ग्रुप GLS कंपनी विकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून GLS चा शेअर्स वधारला आहे. मागील काही महिन्यांपासून या व्यवहाराची बोलणी सुरू आहे. सहा महिन्यांत शेअर 70 टक्क्यांनी वाढून 670 रुपयांवर पोहचला आहे. फेब्रुवारी महिन्यात शेअरची किंमत फक्त 283 रुपये होती. निरमा ग्रुपने 2006 साली फार्मा क्षेत्रात पदार्पण केले. Aculife Healthcare या निरमा ग्रुपच्या कंपनीद्वारे हा व्यवहार होणार आहे.
सौजन्य - गुगल
ग्लेनमार्क विकत घेण्याच्या शर्यतीत इतर कोण?
Sekhmet Pharmaventures आणि ChrysCapital या कंपन्यांनी सुद्धा बोली लावली होती. मात्र, अंतिम टप्प्यात Sekhmet Pharmaventures ने अर्ज माघारी घेतला. तर ChrysCapital ही कंपनीही शर्यतीत मागे आहे. निरमा कंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्स विकत घेण्याच्या व्यवहारात आघाडीवर आहे.
API तयार करणारी आघाडीची कंपनी
ग्लेनमार्क कंपनीकडे 137 महत्त्वाचे API आहेत. औषधे निर्मिती करताना त्यामध्ये API हा महत्त्वाचा कंटेट असतो. त्याची निर्मिती ग्लेनमार्ककडून केली जाते. जगभरातील 700 पेक्षा जास्त कंपन्यांना API पुरवठा केला जातो. हा व्यवसाय आता निरमा कंपनीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, GLS ही कंपनी नफ्यात असून मागली आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण उलाढाल 2,161 कोटी रुपये होती. तर नफा 466.96 कोटी रुपये होता.
सात हजार कोटींचा व्यवहार
या संपूर्ण व्यवहाराचे मूल्य साडेसहा ते सात हजार कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. निरमा कंपनी बाजारातून 7 हजार कोटी उभे करून व्यवहार पूर्ण करणार आहे. एखादी कंपनी अधिग्रहण करण्यासाठी भारतीय बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे खासगी इक्विटी कंपन्यांकडून पैसे उभारण्याची तयारी निरमा करत आहे.
निरमा ग्रुपची कॉर्पोरेट जगतातील उंच भरारी
गुजरातमधील करसनभाई पटेल यांनी 1969 साली निरमा कंपनीची स्थापना केली. कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर, साबण निर्मिती हा कंपनीचा पहिला व्यवसाय होता. त्यांनी गुजरात सरकारमध्ये केमिस्ट म्हणूनही नोकरी केली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी सायकलवरुन निरमा पावडरची गावोगावी जाऊन विक्री केली.
इतर बुहराष्ट्रीय कंपन्यांपेक्षा स्वस्तात डिटर्जंट विकत असल्याने 2000 सालापर्यंत निरमा ब्रँड प्रसिद्ध झाला. निरमा ग्रुपने सिमेंट आणि फार्मा क्षेत्रातही पाय रोवला आहे. 2007 साली खनिज क्षेत्रातील अमेरिकन कंपनी विकत घेतली. तसेच सिमेंट निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्या विकत घेतल्या. आता फार्मा क्षेत्रातील ग्लेनमार्क कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे.