ग्लेनमार्क ही फार्मा क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी आहे. संपूर्ण जगभरात कंपनीची औषधे निर्यात होतात. पदेशातही कंपनीचे निर्मिती प्रकल्प आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून कंपनीची कामगिरी खालावली आहे. फार्मा क्षेत्रातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्लेनमार्कचा समावेश झाला आहे. कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढत असून कंपनीने काही मालमत्ता आणि इक्विटी विकून कर्जाची परतफेड केली आहे. मात्र, अजूनही कंपनीवर कोट्यवधींचे कर्ज आहे. ग्लेन सलढाना हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून कंपनीला पूर्वस्थितित पुन्हा आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे.
नाविन्यपूर्ण औषधांच्या निर्मितीचा फसलेला प्रयत्न
ग्लेनमार्क ही कंपनी मागील खूप वर्षांपासून जेनेरिक औषधांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर होती. मात्र, 2016 साली कंपनीने पुढील दहा वर्षांसाठी एक योजना तयार केली होती. त्यानुसार कंपनीने स्पेशालिटी ड्रॅग्ज, इनोव्हेटिव्ह म्हणजेच नाविन्यपूर्ण औषधे निर्मितीची एक ब्लूप्रिंट सादर केली होती. या योजनेनुसार रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर कोट्यवधी डॉलर खर्च करण्यात आले. नाविन्यपूर्ण औषधे बाजारात विकून कंपनीला अधिक फायदा होईल, अशी आशा होती. मात्र, नवीन औषधांचे संशोधन करण्यात म्हणावे, असे यश आले नाही. 2025 सालापर्यंत कंपनीच्या एकूण नफ्यापैकी 30% नफा स्पेशालिटी ड्रग्जमधून येईल, असा अंदाज कंपनीला होता. मात्र, त्यामध्ये अद्याप थोडीच प्रगती झाली आहे.
अमेरिकेतील बाजारावर लक्ष केंद्रित
कंपनीने भारतीय आणि इतर विकसनशील देशांतील बाजारावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अमेरिकेमध्ये औषधे विकण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी निर्मिती प्रकल्प उभारण्यासही सुरुवात केली. यासाठी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, 2016 पासून अमेरिकेतील फार्मा उद्योगात मोठे बदल झाले. सरकारी धोरणं बदलल्यामुळे कंपनीला अमेरिकेतही चागंली कामगिरी करता आली नाही. जेनेरिक औषध विक्रीमध्ये स्पर्धा वाढल्याने कंपनीला आपला वेगळा ठसा उमटवता आला नाही. ग्लेनमार्कने अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यात एक निर्मिती प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली. या प्रकल्पातील त्रुटीमुळे युएसएच्या फूड अँड ड्रग्ज सेफ्टी ऑर्गनायझेशनने प्रकल्पाला परवानग्या नाकारल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्पही अडकून पडला आहे. परवानग्या मिळवण्याठी अद्यापही काम सुरू आहे.
मागच्या चार-पाच वर्षांपासून कंपनीने गुंतवणूकदारांना फक्त आश्वासने दिले असून फार काही बदल झाला नाही. कंपनीचा नफाही रोडावला आहे. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी कंपनीने भारत आणि विकसनशील देशांतील बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच संशोधनावरील खर्च कमी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून कंपनी दरवर्षी तब्बल 100 मिलियन अमेरिकन डॉलर संशोधनावर खर्च करत होती. त्यात कपात केली आहे.