कोरोना महामारीमध्ये देशातील अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. गेल्या दीड—दोन वर्षानंतर आता कुठे गोष्टी रुळावर येत आहेत. मात्र, महागाईने पुन्हा एकदा नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दर (Repo Rate) जैसे थे ठेवला होता. त्यात 0.40 टक्के वाढ केल्यानंतर आता रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
दरम्यान, देशातील औद्योगिक उत्पादनात मार्च, 2022 मध्ये 1.9 टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनेही (NSO) त्यांच्या अहवालात नमूद केलं होतं की, मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादनात 0.9 टक्के वाढ झाली आहे. खाण उत्पादन, वीज निर्मिती क्षेत्रातही वाढ होत असताना सर्वसामान्यांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.
8 वर्षात महागाईचा उच्चांक
मे, 2014 मध्ये महागाई 8.32 टक्क्यांवर होती. गेल्या काही महिन्यांपासून डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे दूध, भाजीपाला यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होतेय. दरम्यान, केंद्र सरकारने आरबीआयला (RBI) किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा 2 ते 6 टक्के ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ही महागाईच्या वाढीची आकडेवारी समोर आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) एप्रिलमध्ये 7.50 टक्क्यांवर पोहचेल, असा अंदाज याआधीच अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. या अंदाजापेक्षा जास्त महागाईचा दर वाढला आहे. सलग चार महिने महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 1.96 टक्के इतका महागाईचा दर होता. ग्रामीण भागात महागाई दर 8.38 टक्के तर शहरी भागात 7.09 टक्के इतका आहे.
महागाई आणखी वाढणार
मार्च महिन्यातील अन्न महागाई दर हा 7.68 टक्क्यांवरून वाढून 8.38 टक्के इतका झाला. सर्वाधिक महागाई भाजीपाल्यांमध्ये वाढली आहे. मार्चमध्ये भाजीपाल्याचा महागाई दर 11.64 टक्के इतका होता. तर तोच एप्रिलमध्ये तो वाढून 15.41 टक्क्यांवर पोहोचला. आता यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई दर आरबीआयच्या लक्ष्याच्या मर्यादेपेक्षा अधिक
अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे आणि सलग चौथ्या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्या मर्यादेपेक्षा जास्त राहिली आहे. CPIवर आधारित महागाई या वर्षी मार्चमध्ये 6.95 टक्के होती आणि एप्रिल 2021 मध्ये ती 4.23 टक्के होती. एप्रिलमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.38 टक्क्यांवर पोहोचला, जो मागील महिन्यात 7.68 टक्के होता आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात 1.96 टक्के होता. किरकोळ महागाईचा दर जानेवारीपासून सतत 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे.