मार्च महिन्यात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. खाद्यपदार्थ आणि तेलापासून कपडे, चपला यांच्या वाढत्या किमतीमुळे महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारी सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI- Consumer Price Index) आधारित किरकोळ महागाई मार्चमध्ये 6.95% पर्यंत वाढली आहे. अन्नधान्य महागाई 5.85 टक्क्यांवरून 7.68 टक्क्यांपर्यंत वाढली.
गेल्या महिन्याभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात प्रत्येकी 10 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे मालवाहतूक 15 ते 20 टक्क्यांनी महाग झाल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. परिणामी अन्नधान्य, भाजीपाला आणि फळांवर त्याचा परिणाम झाला असून त्यांच्या दरात मोठी वाढ झाली.
किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवर पोहोचला असून, त्याने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) 6 टक्क्यांचे लक्ष्य ओलांडले आहे. हा सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दराने आरबीआयची (RBI) 6 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.07 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. तर मार्च 2021 मध्ये बरोबर 1 वर्षापूर्वी हा दर 5.52 टक्के होता. अलीकडेच, रिझव्र्ह बँकेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर, पहिल्या तिमाहीत महागाईचा अंदाज 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसर्यामध्ये 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% इतका वाढवला.
ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय? What is Consumer Price Index?
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) हे वाहतूक, अन्न आणि वैद्यकीय सेवांसारख्या अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती मोजण्याचे परिमाण आहे. भारतात या परिमाणावरून महागाईचा दर मोजला जातो. प्रत्येक वस्तू आणि सेवांच्या किमतीतील बदल लक्षात घेऊन आणि त्याची सरासरी काढून ग्राहक किंमत निर्देशांक मोजला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पत धोरण ठरवण्यासाठी हा निर्देशांक मुख्य मानक मानते.
महागाई दर कसा ठरतो?
किरकोळ महागाई मोजण्यासाठी, कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च यासारख्या 299 प्रकारच्या वस्तुंचा दर मोजून त्यांच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो.