Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयच्या रेपो दरात वाढ; कर्जाचे हप्ते महागणार

आरबीआयच्या रेपो दरात वाढ; कर्जाचे हप्ते महागणार

RBI hikes benchmark interest rate : जर तुम्ही नवीन कर्ज घेणार असाल किंवा तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला अधिकचा व्याजदर द्यावा लागणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला.

वाढत्या महागाईत आता रिझर्व्ह बॅंकेच्या दरवाढीमुळे कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.95 टक्के इतका वाढला होता. मागील 17 महिन्यांतील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर ठरला होता. त्यात खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत भर पडली होती. त्यात आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांची वाढ करून रेपो दर 4.40 टक्के केला. यामुळे सर्वसामान्यांचे कर्जाचे हप्ते महागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 2 ते 4 मे, 2022 यादरम्यान बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. यापूर्वी आरबीआयने सलग 11 वेळ रेपो दर स्थिर ठेवला होता. रेपो दर स्थिर राहिल्याने कर्जाचे दर स्थिर राहिले होते. मात्र, आता रेपो दर वाढल्याने बँकांचे व्याजदर वाढणार आहेत.

रेपो दर (Repo Rate) म्हणजे काय?

देशातील प्रमुख बँक असणारी रिझर्व्ह बँक इतर बँकांना अल्पमुदतीचा वित्तपुरवठा करताना जो व्याजदर आकारते त्याला रेपो दर म्हणतात. बँका याच पैशांमधून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्याने बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणारी कर्ज कमी व्याजदरावर उपलब्ध होतात. याचा थेट फायदा गृहकर्ज, वाहनकर्जाबरोबरच इतर खासगी कर्ज घेणाऱ्यांना होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि रेपो दर वाढला की कर्ज महाग होते. आरबीआयकडून दर दोन महिन्यांनी रेपो दरांचा आढावा घेण्यात येतो.

रेपो दर वाढण्याचे कारण

खरंतर र‍िटेल इंफेलशन रेट गेल्या तीन महिन्यांपासून 6 टक्क्यांच्या वर आहे. किरकोळ महागाई दर 2 टक्के फरकासह 4 टक्के राखण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत झपाट्याने वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. या निर्णयामुळे कंपन्या आणि लोकांना कर्ज घेणे महागात पडणार आहे.

काय परिणाम होईल?

रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. तसेच जर तुम्ही कोणते कर्ज घेतले असेल तर येणाऱ्या नवीन ईएमआयमध्ये (EMI) वाढ होणार आहे. तसेच जर कर्ज घेणार असाल तरीही त्याचा व्याजदर हा नवीन रेपो दरानुसार असणार आहे. नवीन आणि जुन्या दोन्ही कर्जदारांवर याचा परिणाम होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने गेल्या 2 वर्षांपासून कर्जाचे दर 4 टक्क्यांपर्यंत कमी ठेवले होते. पण सध्या महागाईचा सातत्याने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली. यामुळे सर्व कर्जदार ग्राहकांना भुर्दंड पडणार असून त्यांना अधिकचा व्याजदर द्यावा लागणार आहे.

IMAGE SOURCE -https://bit.ly/3876v18