रोज सकाळी उठल्यावर पेपरमध्ये किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून आणखी काय काय महाग झालंय हे बघायचं आणि गप्प बसायचं. सर्वसामान्य नागरिकांच्या हातात याशिवाय आणखी काही नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती, स्वयंपाकाचा गॅस तसेच खाद्यतेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य गृहिणीपासून ते मोठमोठ्या हॉटेल व्यावसायिकांना भोगावा लागत आहे. या महागाईमुळे साधा वडापाव खायचा झाला तरी सर्वसामान्यांना दोन वेळा विचार करावा लागणार आहे.
बाहेर जाऊन थोडं वेगळ्या चवीचे खायचे म्हटले तर गॅस आणि इंधनाची जशी दरवाढ होते तसे या खाद्यपदार्थांचे भाव ही लगेच वाढतात. भाजीपासून तेलापर्यंत सर्व वस्तुंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात घरगुती सिलेंडर बाटल्याची किंमत 1 हजार रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर बाटल्याची किंमत 2355 रूपये झाली आहे. याचा फटका खाणाऱ्या आणि खिलवणाऱ्या दोन्ही घटकांना बसत आहे. या अशा महागाईत महिन्याच्या बजेटमध्ये दररोज वाढ करणं सामान्य गृहिणीला शक्य नाही. आहे त्याच्यात काटकसर करून गृहिणींना घर चालवावे लागत आहे.
महागाईमुळे व्यावसायिकांनी केली दरवाढ
या वाढत्या महागाईचा परिणाम सर्वच घटकांवर होतोय. चहावाल्यापासून ते 5 स्टार हॉटेल अशा सर्वांनाच त्याचे चटके सहन करावे लागत आहेत. भाज्या, गॅस, तेल महाग झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनीही त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. काही हॉटेल्सनी आपल्या मेनूकार्डावरील खाद्यपदार्थांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढविल्या आहेत. घराला आर्थिक हाताभार लागावा म्हणून पोळी भाजी केंद्र किंवा टिफिन सर्व्हिस देणाऱ्यांनाही भाव वाढवावे लागले. सर्व वस्तुंच्या किमती वाढल्याने 15 ते 25 रुपये वाढविण्याशिवाय आम्हालाही पर्याय नसल्याचे या व्यावसायिकांकडून सांगण्यात येते.
इंधन दरवाढीने काय-काय महागले
इंधनाचे दर वाढल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. मागील महिन्याभरात सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. त्या कारणाने भाज्यांचे दरही कडाडू लागले आहेत. भाज्यांचे दर प्रतिकिलो 80 ते 100 च्या घरात पोहचल्याने हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींना याचा बोजा सहन करावा लागत आहे. इंधन दर वाढल्याने बाजारात भाज्यांची आवकही कमी होऊ लागली आहे. किराणा मालाच्या वस्तूतही मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढ झाली आहे. तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य या वस्तू जवळपास 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाचा दरही प्रति लिटर 170 ते 200 रुपये झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता फक्त हॉटेलातच नाही तर घरातील जेवणाचं ताटही आता महाग झालं आहे.
खाद्यपदार्थ महागल्याचा परिणाम कोणावर?
महागाईचा परिणाम हा सर्वांवरच होतो.
टिफिन सर्व्हिस लावून नोकरी धंदा करणारे, शिकणारे विद्यार्थी किंवा नोकरदार.
दररोज पोळीभाजी केंद्रात जेवणारे नोकरदार किंवा कामगार.
सुट्टीच्या दिवशी बाहेर जेवण्याची इच्छा असणारे सर्वच.
व्यावसायिकांवर दुहेरी संकट
हॉटेल व्यावसायिकांनी मेनूकार्डवरील खाद्यपदार्थांचे दर वाढविल्याने हॉटेल व्यावसायिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भाव वाढविल्याने खवय्यांची गर्दी कमी होते आणि भाव तेच ठेवले तर महागाईमुळे ते परवडत नाही. यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खवय्यांवक ‘करे तो क्या करे…’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.