वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (consumer price index) ताज्या आकडेवारीनुसार, दैनंदिन वापरातील धान्ये, भाज्या, फळे, तेल, डाळी या पदार्थांच्या किमतीत इंधनाच्या तुलनेत बरीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात महिन्यात महागाईने उच्चांक गाठला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरात खाद्यतेलाच्या आणि धान्याच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, अन्न महागाईमध्ये वाढ झाली आहे. फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गोनायजेशन (Food and Agriculture Organization) नेही एप्रिलमध्ये सादर केलेल्या अहवालात म्हटले होते की, जगभरात धान्य आणि तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास खाद्यतेल आणि अन्नधान्यांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पीठाच्या किमतीत तर 2010 पासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 10 मे रोजी 1 किलो पिठाची किंमत 32.95 रूपये झाली. गेल्या वर्षभरात पिठाच्या किमतीत 4 रूपयांनी वाढ झाली आहे. एप्रिल, 2010 मध्ये 1 किलो पिठाची किंमत 17.30 रूपये होती.
पिठाच्या किमतीत वाढ का होत आहे?
कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, देशात गव्हाचे उत्पादन कमी झाले असून, साठा ही कमी होत चालला आहे. तसेच देशाच्या बाहेर ही गव्हाची मागणी वाढू लागली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, 9 मे रोजी राजधानी दिल्लीत 1 किलो पिठाची किंमत 27 रूपये आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 1 किलो पिठ 49 रूपयांवर पोहोचले आहे. तर अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये 59 रूपये 1 किलोचा भाव होता. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुडवडा भासत असून त्यामुळे त्याच्या किमतीही वाढल्या आहेत. या दोन देशांमधून जगभरात एक चतुर्थांश गहू निर्यात केला जातो. 2019 मध्ये रशियाने 8.14 अब्ज डॉलर तर युक्रेनने 3.11 अब्ज डॉलर गहू निर्यात केला होता.
पिठासोबतच तांदूळ, डाळी, तेल, मीठसुद्धा महागले
गेल्या 10 वर्षात 1 किलो तांदळाच्या किमतीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 मे, 2013 मध्य 1 किलो तांदळाची किंमत 25.40 रूपये होती. ती 10 मे, 2022 मध्ये वाढून 36.02 रूपये झाली आहे. तूरडाळीच्या किमतीतही 48 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या 10 वर्षात तूरडाळ 70 रूपयांवरून 103 रूपयांपर्यंत पोहोचली आहे.
बऱ्याचदा महागाईबद्दल बोलताना फक्त इंधनाच्या म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किमतीबद्दल अधिक बोललं जातं. पण प्रत्यक्षात गेल्या 7-8 वर्षात जीवनावश्यक वस्तुंच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकाने (consumer price index) प्रसिद्ध केलेल्या यादीतील 299 वस्तूंपैकी 235 वस्तुंच्या किमतीत गेल्या काही वर्षात इंधनाच्या तुलनेत अधिक वाढ झाल्याचे दिसून येते.