टाटा समुहाचे (Tata Group) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांनी मे 2022मध्ये मुंबईत पेडर रोडवर (Pedder Road, Mumbai) जसलोक रुग्णालयाजवळच्या (Jaslok Hospital) एका इमारतीत ड्युप्लेक्स फ्लॅट (Duplex) घेतला. चंद्रशेखरन हे मूळचे कोईंबतूरचे आहेत. आणि नोकरीच्या निमित्ताने ते उत्तर आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी फिरले आहेत. पण, 2017मध्ये टाटा समुहाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी पेडर रोडवर 33, साऊथ कोंडोनियम (South Condonium) या आलिशान इमारतीत आसरा घेतला.
सुरुवातीला लीजवर राहताना चंद्रशेखरन यांनी या घरासाठी महिन्याला चक्क दोन लाख रुपये भाड्यापोटी मोजलेले आहेत. या इमारतीत अकरा आणि बारावा मजला मिळून त्यांचं हे ड्युप्लेक्स घक आहे आणि मुंबईत आल्यापासून ते इथं राहतायत. मे 2022 मध्ये टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मुदतवाढ मिळाल्यावर हेच घर त्यांनी विकत घेतलं. आणि त्यासाठी त्यांनी तब्बल 98 कोटी रुपये मोजले. हे डील झालं तेव्हाच रिअल इस्टेट उद्योगात ते हाय-प्रोफाईल डील म्हणून लक्षवेधी ठरलं होतं.
आणि आता 2022 वर्षात नोंदणी झालेला भारतातला हा सगळ्यात महाग ‘फ्लॅट’ ठरला आहे. पगारदार व्यक्तीने घेतलेलं हे सगळ्यात महागडं घर असल्याचं एका रिअल इस्टेट कंपनीने सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
चंद्रशेखरन यांचं हे घर 6,000 स्क्वेअर फुटांचं आहे. म्हणजे प्रती स्क्वेअर फुट चंद्रशेखरन यांनी 1.6 लाख रुपये मोजले आहेत. घराची नोंदणी स्वत: चंद्रशेखरन, त्यांच्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावावर झालं आहे.
चंद्रशेखरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेच्या लखनौ कॉलेजमधून व्यवस्थापन शास्त्रातला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आणि 1987 पासून ते टीसीएस या टाटा समुहाच्या कंपनीत कार्यरत आहेत. टाटा समुहाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचा पगार वार्षिक 94 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जातं.