BMC Budget 2023 Highlights: मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) सकाळी आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करण्यात आला. 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 52,619.07 कोटी इतका प्रस्तावित आहे. 2022-23चा अर्थसंकल्प 45,949.21 कोटी रुपये इतका होता. त्यात यावर्षी 14.52 टक्क्यांनी वाढ केली आहे. पण पालिकेच्या महसुलात मात्र 2022-23 मध्ये 1855.98 कोटी रुपयांची घट झाली. सुमारे 50 हजार कोटींच्या वर सादर केलेल्या अर्थसंकल्पात पालिकेने सर्वसामान्यांवर कोणतीही करवाढ केलेली नाही.
मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प आयुक्तांना सादर करण्यात आला.
2022-23 (Budget 2023) या आर्थिक वर्षाकरीता 30,743.61 कोटी रुपयांच्या महसुलाचा अंदाज प्रस्तावित केला होता. त्यात सुधारणा होऊन तो 28,887.63 कोटी रुपये करण्यात आला. तर 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मुंबई महापालिकेने 33,290 कोटी रुपये महसुल उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. 2022-23 च्या तुलनेत यावर्षीचा अंदाज 2546.42 कोटीने जास्त आहे.
Table of contents [Show]
पालिकेच्या 2023-24च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
- सागरी किनारा रस्ता प्रकल्प 3545 कोटी रुपये
- प्रथामिक शिक्षणासाठी 3347 कोटी रुपये
- मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी 2792 कोटी रुपये
- रस्त्यांच्या सुधारणांसाठी 2825 कोटी रुपये
- रस्त्यांवरील पुलांकरीता तरतूद 2100 कोटी रुपये
- पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांकरीता 2527 कोटी रुपये
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 366.50 कोटी रुपये
- आश्रय योजनेकरीता 1125 कोटी रुपये
- गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी 1060 कोटी रुपये
- राणीच्या बागेचे (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) आधुनिकीकरणासाठी 133.93 कोटी रुपये
- देवनार पशूवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता 13.69 कोटी रुपये
महापालिका शिक्षणाचे बजेट 3347.13 कोटी
महापालिकेने मागच्या वर्षी शिक्षणावर मोठी तरतूद केली होती. पण यावर्षी पालिकेने शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प 23 कोटींनी कमी केला आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 3,370.24 कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. तर 2023-24 या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 23 कोटींनी घट केली असून तो 3,347.13 कोटी रुपये अंदाजित केला आहे.
आरोग्य विभागाकरीता पालिकेकडून विशेष तरतूद
मुंबई महापालिकेने कोविड-19 नंतर आरोग्य सुविधांवरील खर्चात वाढ केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6,309.38 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद एकूण अर्थसंकल्पाच्या 12 टक्के इतकी आहे.
- भगवती रूग्णालयाच्या पुनर्विकासासाठी 110 कोटी रुपये
- गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी 110 कोटी रुपये
- एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 95 कोटी रुपये
- कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामासाठी 75 कोटी रुपये
- सायन रुग्णालयाच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी 70 कोटी रुपये
- भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिकेच्या रुग्णालयासाठी 60 कोटी रुपये
- वान्द्रे येथील भाभा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 53.60 कोटी रुपये
- संघर्ष नगर येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या राखीव भुखंडाच्या विकासासाठी 35 कोटी रुपये
मुंबई पालिकेच्या मालमत्ता करात मोठी घट
मुंबई महापालिकेने 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून (Property Tax) 7,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण पालिकेच्या सुधारित अंदाजानुसार 4,800 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. पण प्रत्यक्षात मात्र 31 डिसेंबर, 2022 पर्यंत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून 3,174.456 कोटी रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात 2,200 कोटी रुपये इतकी घट झाली.