पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2023 ला ‘वन कार्ड फॉर वन नेशन’ ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. आणि अशा पहिल्या कार्डाचं अनावरणही पहिल्यांदा 27 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्याच संकल्पनेवर आधारित एक कार्ड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबईकरांच्या सेवेत आणलं आहे. या कार्डाचं नाव आहे मुंबई 1 कार्ड (Mumbai 1). या कार्डमुळे आता मुंबईकरांना मेट्रो आणि बेस्टने सहज प्रवास करता येणार आहे, तो कसा हे जाणून घ्या…
केंद्रसरकारने मांडलेली संकल्पना ही नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) ही आहे. आणि सध्या MMRDA नं देऊ केलेलं कार्डही तसंच आहे. एकदा हे कार्ड रिचार्ज केलंत की, त्यातून तुम्ही मेट्रो आणि बसने प्रवास करू शकाल. तुमच्या तिकिटाच्या दराएवढे पैसे कार्डातूनच वळते केले जातील. अशा सुविधा असलेल्या या कार्डाविषयी सविस्तर जाणून घेऊया…
Table of contents [Show]
मुंबई 1 कार्ड कुठे मिळतं?
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे एक इंटर-सिस्टम ट्रान्सपोर्ट कार्ड आहे. सध्या हे कार्ड मेट्रोच्या सर्व तिकीट काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय हे कार्ड एसबीआय बँक (SBI Bank) पुरवत असल्याने, या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन प्रवासी खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्ही एसबीआय बँकेच्या (SBI Bank) कोणत्याही शाखेला प्रवासी भेट देऊ शकतात.
कार्ड खरेदी करण्यासाठी खर्च किती? रिचार्ज कुठे करावा?
मुंबई 1 हे कार्ड विनामूल्य असून त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. मात्र त्याचा रिचार्ज प्रवाशांना करावा लागणार आहे.
हा रिचार्ज करण्यासाठी मेट्रोच्या तिकीट काउंटरवरची प्रवासी मदत घेऊ शकतात किंवा मेट्रो स्थानकावरील AVM मशीनच्या मदतीने देखील रिचार्ज करता येतो. याशिवाय ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी transit.sbi या वेबसाईटला भेट देऊ शकता.
कार्डवरील नंबरच्या मदतीने नोंदणी केल्यानंतरच प्रवाशांना या कार्डवर रिचार्ज करता येणार आहे.
रिचार्ज करण्यासाठी किमान आणि कमाल किती रक्कम भरावी लागते?
या कार्डवर रिचार्ज करण्यासाठी किमान 100 रुपये तर, कमाल 2000 रुपयांपर्यंत रिचार्ज करता येतो. ऑनलाईन रिचार्ज करताना कार्ड पेमेंट, युपीआय आणि पेटीएम यासारखे आधुनिक पर्याय प्रवाशांना देण्यात आले आहेत. ज्यामुळे सहज रिचार्ज करता येईल व प्रवास सुखकर होईल.
मेट्रोशिवाय अजून कुठे कार्ड वापरता येते?
मुंबईतील बेस्ट बस सेवा या कार्डशी संलग्न करण्यात आली आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करताना पैसे देऊन तिकीट काढण्याची गरज आता मुंबईकरांना लागणार नाही. त्यांच्यासाठी केवळ हे कार्डचं पुरेसे आहे. या कार्डच्या मदतीने प्रवाशांना मुंबईत कुठेही बेस्ट बसने प्रवास करता येणार असून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय या कार्डच्या मदतीने तुम्ही शॉपिंग देखील करू शकता, मात्र सध्या ही सुविधा काही सुरक्षिततेच्या कारणास्तव चालू केलेली नाही. भविष्यात या कार्डच्या मदतीने लोकलचा प्रवासही सहज करता येणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेशी चर्चा सुरु आहे.
एका कार्डवर किती लोक प्रवास करू शकतात?
सध्याच्या घडीला मुंबई 1 या कार्डच्या मदतीने एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवास करता येणे शक्य आहे. दुसऱ्या व्यक्तीला एकाच कार्डवर प्रवास करणे शक्य नाही. प्रवास करण्यासाठी त्या व्यक्तीला तिकीट किंवा मुंबई 1 कार्डची आवश्यकता असणार आहे.