देशातल्या लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSME) त्यांची उत्पादनं आता फ्लिपकार्ट (Flipkart)आणि वॉलमार्टच्या (Wallmart) माध्यमातून विकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी केंद्रसरकारने पुढाकार घेतला असून या दोन कंपन्यांबरोबर तसा करार केला आहे. देशातल्या लघु, मध्यम उद्योगाला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय उद्योग मंत्रालयाने घेतला आहे.
वॉलमार्ट व फ्लिपकार्टने केली राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाशी (NSIC) हातमिळवणी
वॉलमार्टआणि फ्लिपकार्ट या देशातील ऑनलाईन रिटेल व्यवसायातील (Online Retail) आघाडीच्या कंपन्यांनी मंगळवारी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाशी (NSIC) सामंजस्य करार केला आहे. या करारानंतर, देशभरातील अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) त्यांच्या क्षमतांचा विस्तार करण्यास सक्षम होतील. ही भागिदारी एमएसएमईंना स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील किरकोळ पुरवठ्याशी थेट जोडण्यात मदत करेल.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
नवी दिल्ली येथे मंगळवारी वॉलमार्ट वृद्धी सेलर समिट आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक कार्यक्रमात, 20,000 एमएसएमईंला वॉलमार्ट वृद्धी पुरवठादार विकास कार्यक्रमा (Walmart Vriddhi) अंतर्गत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात आली. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे (NSIC) मुख्य व्यवस्थापकीय संचालक(CMD) गौरांग दीक्षित देखील उपस्थित होते.
छोट्या व्यावसायिकांना मिळेल मोठी चालना
NSIC सोबतच्या या भागीदारीमुळे, देशभरातील अधिकाधिक लहान व्यवसाय आणि उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोफत वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळाली. या वृद्धी कार्यक्रमांतर्गत एमएसएमईसाठी प्रशिक्षणे, चर्चासत्रे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.
20 हजार एमएसएमईंना मिळाला लाभ
या कार्यक्रमामध्ये देशभरातील महानगरांव्यतिरिक्त टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून हजारो एमएसएमईंनी नोंदणी केली आहे. यामध्ये आतापर्यंत 20,000 हून अधिक एमएसएमईंनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ही भागीदारी सहभागी एमएसएमईंना NSIC च्या योजनांचा लाभ मिळवून देईल, तसेच NSIC कडे नोंदणी केलेल्या सर्व एमएसएमई पर्यंत वृद्धी संसाधने चॅनेलाईज करेल.
देशातील एमएसएमईंना मिळेल भरघोस लाभ
या कार्यक्रमा संदर्भात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, "वॉलमार्टच्या वृद्धी कार्यक्रमामुळे मोठ्या संख्येने भारतीय एमएसएमईंना त्यांचे उत्पादन वाढविण्यात आणि त्यांचा अनुभव घेण्यासाठी मदत मिळाली आहे हे पाहून मला आनंद होत आहे." विशेषत: महामारीच्या काळात वॉलमार्ट एमएसएमईना प्रशिक्षण देण्यात तसेच त्यांची क्षमता वाढविण्यात आघाडीवर राहिले आहे. भारतात एमएसएमई क्षेत्रामध्ये सध्या 6.3 कोटी एमएसएमई आहेत, ज्यातून सुमारे 11 कोटी लोक रोजगार घेत आहेत. देशातील वाढत्या एमएसएमई क्षेत्राला वॉलमार्टचा सतत पाठिंबा राहील अशी आम्ही अपेक्षा करतो.
एनएसआईसी काय म्हणाले?
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक(CMD) गौरांग दीक्षित म्हणाले की, “NSIC भारतातील एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. एमएसएमईला आमच्या योजनांशी एकत्रित येण्याची संधी मिळावी आणि NSIC अंतर्गत एमएसएमईसाठी वृद्धीची संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही Walmart Vriddhi सोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत. या भागीदारीद्वारे, देशभरातील एमएसएमईंना भारतात आणि परदेशात त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी आवश्यक ती मदतही मिळू शकते.