KDMC News Update: डोंबिवली मधील एमआयडीसी(MIDC) निवासी परिसरातील रस्त्यांच्या काँक्रीटकरणाचं काम सुरू आहे. या कामाला सुमारे 110 झाडांची बाधा निर्माण होत आहेत, म्हणून ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने(MMRDA) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी ही झाडे तोडण्यास विरोध केला आहे. नेमका काय प्रकार आहे चला जाणून घेऊयात.
झाडे तोडण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध?
डोंबिवलीतील एमआयडीसी(MIDC) मधील निवासी परिसरातील प्रदूषणामुळे रहिवासी त्रस्त आहेत. एमआयडीसी(MIDC) निवासी परिसरात रस्त्यांच्या काँक्रीटकरणाचं काम सुरू आहे. या कामाला 110 झाडे बाधा निर्माण करून कामात अडथळा आणत आहेत म्हणून ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने(MMRDA) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे(KDMC) परवानगी मागितली आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी ही झाडे तोडण्यास विरोध केला आहे.
झाडे तोडल्यास प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा वाढेल त्यामुळे झाडे न तोडता झाडांचे पुनर्रोपण करा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत पालिका प्रशासनाने मात्र अर्ज प्राप्त झाल्यापासून कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी करून खरंच झाडे तोडण्याची गरज आहे का ? जास्तीत जास्त झाडे कशी वाचवता येतील, झाडांचे पुनर्रोपण करता येऊ शकते का? या बाबी तपासून घेऊनच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
रस्ते विकासाचे काम एम. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला
डोंबिवली निवासी भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. निवासी भागात प्रदूषणाचा त्रास असल्याने ही वनराई प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी कामी येते असे तेथील निवासी रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली असून रस्ते विकासाचे काम एम. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला(M. A. Construction Company) देण्यात आले आहे. या कंपनीने दिलेल्या प्रस्तावानुसार जवळपास 110 झाडे या रस्ते विकासाच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. म्हणून यासंदर्भातील झाडे तोडण्याचा अर्ज पालिकेकडे पाठवला आहे.