माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (मंगळवार) ते मुंबईत आले असून त्यांचा हा ऑफिशियल दौरा आहे. ग्राहक, स्टार्टअप कंपन्या, उद्योजक, विकासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांना ते भेट देणार आहेत. दिल्लीमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा नाडेला भेटणार आहेत. याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये नाडेला भारत दौऱ्यावर आले होते.
मुंबईमधील मायक्रोसॉफ्ट उद्योग समुहाच्या बैठकीने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती आणि प्रमुख व्यक्तींसोबत विविध बैठका घेणार आहेत. मुंबईमध्ये 'मायक्रोसॉफ्ट फ्युचर रेडी लिडरशीप' बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उद्योग जगतातील प्रमुख सहभागी होणार आहेत.
बुधवारी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची देखील ते भेट घेणार आहेत. सोबतच आयटी, कम्युनिकेशन आणि रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत. भारतीय वंशाचे अल्फाबेट कंपनीचे प्रमुख सुंदर पिचाई यांचा भारत दौरा झाल्यानंतर दोनच आठवड्यांनी नाडेला भारतात आले आहेत.
कोण आहेत सत्या नाडेला?
सत्या नाडेला हे भारतीय वंशाचे नागरिक असून भारतातील हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. सध्या त्यांच्याकडे अमेरिका देशाचे नागरिकत्व आहे. त्यांचे वडील 1962 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय अधिकारी होते, तर आई संस्कृतच्या शिक्षिका होत्या. कर्नाटकातील मनिपाल इस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकाला गेले होते. मायक्रोसॉफ्टमधील क्लाउड काम्युटिंग सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केल्यानंतर त्यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली.