आपण अनेक गोष्टींवर अतिरिक्त खर्च करतोय हेच आपल्याला कळत नाही. खरे तर आपण काहीही कारण नसताना देखील खर्च करत असतो. अनेकवेळा आपले उत्पन्न, आपला दैनंदिन खर्च, आपल्यावर असलेली कर्जं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत नाही आणि त्याचमुळे आपल्याला खर्चांवर नियंत्रण आणता येत नाही. तुम्हाला तुमचे खर्च नियंत्रणात आणायचे असतील तर हे टिप्स नक्कीच वाचा...
खर्चाचा अभ्यास करा
आपण कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करत आहोत, त्यात कोणकोणते अनावश्यक खर्च आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेकवेळा काहीही गरज नसताना आपण अनेक वस्तूंची शॉपिंग करतो, जेवण बनवायला कंटाळा आला आहे असे वाटत असल्याने जेवायला बाहेर जातो या सगळ्यामुळे आपला प्रचंड खर्च होतो. हे खर्च आपण कशाप्रकारे टाळू शकतो याचा विचार करावा.
खर्चाचा अभ्यास
कोणताही खर्च केल्यानंतर हा खर्च करण्याची खरंच गरज होती का हे स्वतःच्या मनाला विचारणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते खर्च करत आहोत याची नोंद केल्यास आपण खर्च नियंत्रणात आणू शकतो. प्रत्येकाने महिन्याभराचे बजेट तयार करावे. यात आपले आवश्यक खर्च कोणते आहेत, इर्मजन्सी फंड म्हणून किती पैसे बाजूला ठेवायचे, या सगळ्यातून आपण किती पैशांची बचत करणार या सगळ्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
रोख रक्कमेचा वापर करा
आपण अनेकवेळा शॉपिंगसाठी अथवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतो. क्रेडिट कार्डपेक्षा डेबिट कार्ड अथवा रोख रक्कमेचा वापर करा. आपल्या खिशात पैसे नसतील तरी क्रेडिट कार्डमुळे अनेकांना अनावश्यक खर्च करण्याची सवय लागते. क्रेडिट कार्डमुळे पैसे भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळत असल्याने पैसे खर्च करायला व्यक्ती मागे पुढे पाहात नाही. पण त्याचऐवजी तुम्ही डेबिट कार्ड अथवा रोख रक्कमेचा वापर करत असाल तर तुमच्याकडे पैसे असतील तितकाच खर्च तुम्ही कराल... अथवा खर्च करण्याआधी ही रक्कम मी दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी ठेवली आहे. त्यामुळे मी सध्या अनावश्यक खर्च करू शकत नाही हे तुमच्या लक्षात येईल.
यादी बनवा
कधीही घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना तुम्हाला कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत याची यादी बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे शॉपिंग मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही अनावश्यक खर्च करणार नाहीत.
आर्थिक ध्येय डोळ्यांसमोर ठेवा
मला पुढील काही महिन्यात एखादी वस्तू खरेदी करायची आहे, एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करायचे आहेत, एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे आहे हे ध्येय तुम्ही डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. तुम्ही एखादे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःचा खर्च कमी करणार यात काहीच शंका नाही.
प्रत्येक पैशाचा विचार करावा
आपण कमवत असलेला प्रत्येक पैसा हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पैसा खर्च करताना विचार करणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक खरेदीच्या वेळेस आपला एखादा रुपया तरी वाचवू शकलो तर आपण महिन्याभरात चांगलाच पैसा वाचवू शकतो. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीवर किती खर्च करत आहोत हे पाहावे.