Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करा गुंतवणूक, वर्षभर राहा टेन्शन फ्री!

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करा गुंतवणूक, वर्षभर राहा टेन्शन फ्री!

Image Source : www.npscu.ca

Invest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.

इंग्रजी कॅलेंडरनुसार आपले नवीन वर्ष जानेवारीला सुरू होते आणि डिसेंबरला संपते. पण आपले आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्चला संपते. त्यामुळे पगारदार किंवा टॅक्स लागू असलेल्यांना 31 मार्चच्या आत रिटर्न फाईल करणे बंधनकारक असते. अन्यथा तुम्हाला त्यावर दंड भरावा लागतो. अनेकजण मार्चच्या अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत रिटर्न फाईल करत नाहीत. परिणामी त्यांना घाईत निर्णय घ्यावे लागतात. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते आणि ऐनवेळी पुरेसे पैसेही उपलब्ध नसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

आर्थिक गुंतवणूक ही घाईघाईत करण्याची गोष्ट नाही. पैसे कमावण्यासाठी आपण जितकी मेहनत घेतो. तितकीच मेहनत पैसे वाचवण्यासाठी घेणं गरजेचं आहे. यासाठी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या गरजेनुसार गुंतवणूक करणे आवश्यक आहे. येणाऱ्या वर्षात तुम्ही किती पैसे कमवणार आहात? गेल्या वर्षी तुमचे किती उत्पन्न होते? सध्याच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती लाभ घेता येणार आहे? तुमच्यावर सध्या कर्ज किती आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूक करावी. यातून तुम्हाला येणाऱ्या वर्षात किती गुंतवणूक करावी लागेल, याचा निश्चित अंदाज बांधता येईल.

कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.

उतारवयासाठी गुंतवणूक (Investment for Retirement)

सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे शिल्लक असले पाहिजेत याचा विचार करून आता गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तसेच गुंतवणूक करताना तुम्ही जोखीम पत्करण्यास तयार आहात का? याचा ही विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या फंडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund - VPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System - NPS) मध्ये पैसे गुंतवू शकता.

घरासाठी कर्ज (Home Loan)

बऱ्याच जणांना घर घेताना सगळे पैसे एकत्रित देणं जमत नाही, त्यामुळे गृह कर्ज (Home Loan) काढले जाते. होम लोन हा कर सवलतीसाठी आणि घर विकत घेण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कर्जाच्या व्याजावर 2 लाखापर्यंत सवलत मिळू शकते. तसेच कर्जाची मूळ रक्कम तुम्ही परत केल्यास आयकरच्या 80C अंतर्गत ही तुम्हाला सवलत मिळते. ही सवलत दीड लाखापर्यंतची असते.

कर व्यवस्था (Tax Regime)

केंद्रिय अर्थसंकल्पनात आयकराविषयी करण्यात येणारी घोषणा हा अर्थसंकल्पनेतील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कर भरताना अर्थसंकल्पनात काहीतरी सवलत मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कर भरताना कोणता Tax Regime तुमच्यासाठी अधिक योग्य आहे याची निवड तुम्ही करू शकता. यासाठी कर भरताना जुन्या आणि नवीन पद्धतीचा तुम्ही विचार करू शकता. अशा गोष्टींचा वर्षाच्या अखेरीस विचार करण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीला करणे योग्य असते.

टॅक्स डिक्लरेशन (Tax Declaration)

कर वाचवण्यासाठी तुम्ही tax declaration लवकरात लवकर करणे गरजेचे असते. तुमच्या बँकेत असणाऱ्या पैशांवर तुम्हाला व्याज मिळतं पण तुमचे उत्पन्न कर भरण्याच्या रक्कमेपेक्षा (Income tax slab) कमी असल्यास फॉर्म 15G  किंवा फॉर्म 15H भरू शकता. त्यामुळे तुमचा TDS (tax deducted at source) कापला जाणार नाही. जर तुमचे उत्पन्न जास्त असल्यास फॉर्म 13 भरून तुम्ही TDS  वाचवू शकता.

कर वाचवण्यासाठी आणि एकूणच भविष्यातील तरतूद म्हणून गुंतवणूक करताना वर्षाच्या सुरूवातीलाच गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करून योग्य गुंतवणूक करा.